आरोग्यमुख्य बातमीशैक्षणिक

विद्यार्थ्यांनी योगाच्या माध्यमातून स्वतःला परिपूर्ण बनवावे : रमा जोग

जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडीच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त मोफत योग शिबिराचे आयोजन

खंडाळा : “आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला निरोगी जीवन जगण्यासाठी आणि विविध आजारावर मात करण्यासाठी योग आणि प्राणायाम हा अत्यंत आवश्यक घटक असून त्याद्वारे निरोगी आणि दीर्घायुषी जगता येत असल्याने सर्वानी योग शिबिरात सहभागी होऊन स्वतःला विविध रोगापासून दूर ठेवत निरोगी आयुष्य जगण्यासाठी परिपूर्ण बनवावे”, असे आवाहन पतंजली योग समितीच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्या रमा जोग यांनी केले.

रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी शाळेच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांपैकी पतंजली योग समितीच्या सहकार्याने शाळा आणि शाळा परिसरातील सर्व विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ यांच्यासाठी मोफत योग शिबिराचे आयोजन केले होते. त्याच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी सर्वप्रथम दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांपैकी सामाजिक कार्यकर्ते बाळशेठ जोग यांनीही योगाचे महत्त्व सांगताना शाळेने आयोजित केलेल्या योग शिबिराचे कौतुक करताना शुभेच्छा दिल्या. तसेच चित्रलेखा गांधी यांनीही विद्यार्थी, पालक यांच्यासाठी या शिबिराची उपयुक्तता सांगितली.

उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष आणि शाळा विकास समितीचे अध्यक्ष अप्पा धनावडे यांनीही या शिबिरात जास्तीत जास्त विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन केले.

यावेळी ग्रुप ग्रामपंचायत वाटद मिरवणेचे सरपंच अमित वाडकर, सामाजिक कार्यकर्ते शेखरशेठ भडसावळे, कळझोंडी गावचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संदीप पवार, सामाजिक कार्यकर्त्या चित्रलेखा गांधी, बालरक्षक विश्वनाथ शिर्के, उपाध्यक्ष मारुती कुर्टे, अनिल रेवाळे यांच्यासह विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

या शिबिराचे नियोजन पंचायत समिती रत्नागिरीच्या गटशिक्षणाधिकारी प्रेरणा शिंदे, गणपतीपुळे प्रभागाच्या शिक्षण विस्तार अधिकारी सविता तोटावार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. हे शिबीर अत्यंत नियोजनपूर्वक पतंजली योग समितीच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्या रमाताई जोग यांच्या मार्गदर्शनाखाली रोज सकाळी पाच ते सात या वेळेत संपन्न होणार आहे. हे शिबीर यशस्वी होण्यासाठी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा स्वाती धनावडे यांच्यासह शाळा विकास समिती, शालेय व्यवस्थापन समिती, वाटद कवठेवाडी, वाटद तांबटकरवाडी, वाटद धोपटवाडी मधील सर्व पालक आणि ग्रामस्थ प्रयत्न करत आहेत.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक माधव अंकलगे आणि आभार राधा नारायणकर यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!