आबलोली ग्रामपंचायतीला आनंद जाधव यांनी दिली राज्य घटना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट

आबलोली (संदेश कदम) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक, राजकीय, धम्म आणि शैक्षणिक चळवळीत निस्वार्थीपणे, कर्तव्यदक्ष, एकनिष्ठ कार्य तत्पर कठीण समयी खंबीरपणे ऊभे राहणारे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतील विश्वासू कार्यकर्ते कुडली (ता. गुहागर) गावाच्या सर्वांगिण विकासासाठी झटणारे गावचे सुपुत्र कालकथीत शिवराम पांडुरंग जाधव आणि त्यांना खंबीरपणे सावली सारखी साथ देणाऱ्या त्यांच्या सुविद्य पत्नी कालकथीत प्रभावती शिवराम जाधव यांच्या स्मरणार्थ त्यांचे धाकटे चिरंजीव आनंद शिवराम जाधव यांनी निर्मल ग्रामपंचायत आबलोलीला राज्यघटना प्रत व घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट म्हणून दिली.
आनंद जाधव हे आपल्या आई-वडिलांचा सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, आर्थिक कार्याचा वसा पुढे चालवत असून गुहागर तालुक्यातील आबलोली या ग्रामपंचायतीला त्यांनी मान्यवरांच्या हस्ते भारतीय राज्यघटना प्रत व घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके, ग्रामपंचायत अधिकारी बाबूराव सुर्यवंशी यांना देण्यात आली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंद जाधव यांनी केले. त्यानंतर बुद्ध धम्माचे गाढे अभ्यासक बबनराव कदम यांनी भारतीय संविधान हे ग्रामपंचायतीच्या दर्शनीभागी काचपेटीत ठेवण्याची सूचना करून या संविधानाप्रमाणे ग्रामपंचायतीचा कारभार करा, असे सांगितले. तसेच आनंद जाधव यांचे आभार मानले.
त्यानंतर पंचशील बौद्ध विकास मंडळ कुडली मंडळाचे सल्लागार व महाराष्ट्र बॅंकेचे सेवानिवृत्त कर्मचारी अनंत कांबळे, आबलोलीचे ग्रामविकास अधिकारी बाबूराव सुर्यवंशी, सरपंच सौ. वैष्णवी नेटके यांनी कालकथीत शिवराम जाधव, कालकथीत प्रभावती जाधव यांचा तसेच आनंद जाधव आणि जाधव कुटुंबीयांच्या धार्मिक, सामाजिक, राजकीय व शैक्षणिक विकासात्मक कार्याचा गौरव केला.
यावेळी निर्मल ग्रामपंचायत आबलोली या ग्रामपंचायतीच्या सभागृहात विचारपीठावर तंटामुक्त समिती आबलोलीचे अध्यक्ष आप्पा कदम, सरपंच सौ. वैष्णवी नेटके, ग्रामविकास अधिकारी बाबूराव सुर्यवंशी, उपसरपंच अक्षय पागडे, बुद्ध धम्माचे गाढे अभ्यासक बबनराव कदम, आनंद जाधव, पंचशिल बौद्ध विकास मंडळ कुडली मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण जाधव, तंटामुक्त समिती कुडलीचे अध्यक्ष अनिल जाधव, अनंत कांबळे, रविंद्र जाधव, तुकाराम शिवराम जाधव, साक्षी आनंद जाधव, ग्रामपंचायत सदस्य संजय कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाला आनंदवन बुद्ध विहार मौजे आबलोली या विश्वस्त संस्थेचे मुंबई मंडळाचे अध्यक्ष सुरेश पवार, गाव मंडळाचे अध्यक्ष दत्ताराम कदम, सेक्रेटरी अविनाश कदम, कार्यकारणी सदस्य व उद्योजक अमोल कदम, प्रमोद पवार, कार्यकर्ते सिध्दार्थ पवार, संजय कदम, उदय कदम, मिलिंद कदम, आनंद कदम, विनोद कदम, सुरेश भाऊ पवार आदी मान्यवर उपस्थित होते.



