मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

मुंबईत २६ एप्रिलला महाराष्ट्र रेल्वे परिषद

कोकणवासीयांच्या प्रश्नांवर होणार चर्चा

खेड : अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती, महाराष्ट्र यांच्या वतीने “महाराष्ट्र रेल्वे परिषद” आयोजित करण्यात आली आहे. ही परिषद येत्या २६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजल्यापासून मुंबई येथे होणार आहे. परिषदेत महाराष्ट्रातील रेल्वे प्रश्नांवर, विशेषतः कोकणातील प्रवाशांना भेडसावणाऱ्या अडचणींवर सविस्तर चर्चा होणार आहे. कोरोना काळात बंद झालेल्या गाड्या, तसेच महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांचा इतर राज्यांना होणारा फायदा यामुळे मराठी जनतेवर अन्याय होत असल्याचा मुद्दा या परिषदेत मांडला जाणार आहे.

यासोबतच सावंतवाडी टर्मिनसच्या प्रश्नावरही परिषदेत जोरदार चर्चा अपेक्षित आहे. कोकणात धावणाऱ्या अनेक गाड्या गोव्यापर्यंत जात असल्याने स्थानिक प्रवाशांना तिकिटांची कमतरता भासते. पर्यटक व परराज्यातील प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे कोकणातील नागरिकांना रेल्वे प्रवासात अडचणी येत असल्याचे समितीने नमूद केले आहे. त्यामुळे सावंतवाडी येथे स्वतंत्र टर्मिनस उभारण्याची मागणी पुन्हा एकदा ठळकपणे मांडली जाणार आहे.

या परिषदेत दादर रत्नागिरी पॅसेंजर, सह्याद्री एक्सप्रेस, हडपसर–नांदेड एक्सप्रेस यांसारख्या प्रलंबित रेल्वे सेवांवरही चर्चा होणार आहे. ही परिषद मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, सुरेंद्र गावस्कर सभागृह (दुसरा मजला), दादर पूर्व येथे होणार असून कोकणवासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!