मुख्य बातमी

टेंभ्ये येथील श्री भैरी जुगाईचा शिमगोत्सव उद्या 

रत्नागिरी : शहराजवळील टेंभ्ये येथील श्री भैरी जुगाईची पालखी मिरवणूक उद्या (२ मार्च) निघणार असून दुपारी १ वाजता रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरीच्या भेटीला जाणार आहे. ग्रामदैवत श्री देव भैरी जुगाई टेंभ्ये श्री सिद्धेश्वर मंदिरातून ढोल-ताशाच्या गजरामध्ये काजरघाटी, नाचणे, मारुती मंदिर, बसस्थानक, मारुती आळी, गोखलेनाका, विठ्ठल मंदिर, काँग्रेस भवन, श्री मुरलीधर मंदिर खालची आळी येथून श्री भैरी देव मंदिरात भेटीसाठी रात्री ८.३० पर्यंत जाईल. तेथे भाविकांच्या दर्शनासाठी मंदिरात थांबेल.

तेथून परत खालची आळी मार्गे, श्री मुरलीधर मंदिर मार्गे, काँग्रेस भवन, गोखले नाका, राधाकृष्ण नाका, धनजीनाका मार्गे शहर पोलीस ठाण्यात जाईल. तेथून धनजी नाका, गवळीवाडा, हेडक्वाटर, श्री महापुरुष मंदिर, पोलीस लाईन मार्गे माळनाका येथून वाहनाने टेंभ्ये येथे मुख्य मानकरी कै. सदानंद सखाराम साळवी यांची आरती घेऊन चौसोपी वाडी येथे प्रमोद आग्रे यांच्या घराशेजारी होळी तोडण्याच्या ठिकाणी थांबेल.

३ मार्च रोजी सकाळी ९ वाजता होळी तोडण्याचा कार्यक्रम होईल. तेथून होळीसह पालखी पारंपरिक वाटेने श्री भैरी जुगाई मंदिर टेंभ्ये येथे सहाणेवर विराजमान होईल. त्यानंतर पालखी नाचवण्याचा कार्यक्रम होईल. सायंकाळी ६.४० वाजता होळी उभी करण्यात येईल. होळीची विधीवत पूजा होईल. नंतर गावगाऱ्हाणे होऊन ओट्या भरण्याचा कार्यक्रम होईल.

भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री भैरीजुगाई वरदायीनी भराडीन देवस्थान टेंभ्येच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!