मुख्य बातमी

रत्नागिरी जिल्ह्यात पहिला टँकर धावला

सोमेश्वर (ता. रत्नागिरी) गावात टँकरने पाणीपुरवठ्याला सुरुवात

रत्नागिरी : सध्या उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढतच असून, कडक उन्हामुळे भूजल पातळी घटत आहे. त्यामुळे आता पाण्याची चणचण जाणवू लागली असून, जिल्ह्यातील पहिला टँकर रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर गावात धावला आहे. तसेच खेड व संगमेश्वर तालुक्यातील काही गावांनी टँकरसाठी मागणी केली आहे.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही दरवर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. भौगोलिक परिस्थितीचे कारण सांगितले जात असले तरी पाणी साठवण्यासाठी शासकीय तसेच जनतेचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. त्यात अधिकार्‍यांची मानसिकताही महत्त्वाची ठरत आहे. जिल्ह्यात धरणांची संख्याही फारच कमी आहे. फेब्रुवारी, मार्च महिना उजडला की दरवर्षी पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. यावर्षी पाऊस लांबल्याने पाणी टंचाईला थोडा उशीरा झाला.

जिल्ह्यात यावर्षी पहिलाच टँकर हा रत्नागिरी तालुक्यात धावला आहे. गतवर्षी लांजा तालुक्यात फेब्रुवारी महिन्यात पहिला टँकर धावला होता. यावर्षी रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर या गावात टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. तसेच खेड व संगमेश्वर तालुक्यातील काही गावांनी पाण्यासाठी टँकरची मागणी केल्याचे समजते.

चालू वर्षी जिल्ह्याचा संभाव्य पाणी टंचाई कृती आराखड्याला नुकतीच मंजूरी मिळाली असून तब्बल ३५७ गावांतील ७२२ वाड्यांचा यामध्ये समावेश आहे. यासाठी ९ कोटी ४९ लाख ७० हजार रुपयांची आवश्यकता आहे. यावर्षी संगमेश्वर, खेड, चिपळूण, दापोली, लांजा, मंडणगड आणि रत्नागिरी या तालुक्यांना सर्वांधिक पाणी टंचाई जाणविण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!