नाटेकर बालमंदिरात आषाढी एकादशी साजरी

रत्नागिरी : कै. जयराम शंकर नाटेकर बालमंदिरात आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. कै. ल. ग. पटवर्धन बालवाडी विभागात आषाढी एकादशीनिमित्त वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. चिमुकल्यांनी वारकऱ्यांच्या वेशात दिंडीत सहभागी होत हरिनामाचा गजर केला.
शाळेच्या आवारात प्रथम पालखीतील विठ्ठलाच्या प्रतिमेचे पूजन बालवाडी शिक्षिका सौ. सुर्वे, सौ. चव्हाण तसेच पालक प्रतिनिधींनी मिळून केले. सर्व विद्यार्थी वारकऱ्यांच्या वेशभूषेत आले होते. विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानदेव, तुकाराम, मुक्ताबाई यांच्या वेशातील बालमंडळी अतिशय सुंदर दिसत होते. पालखीसोबत विठ्ठल-रुक्मिणी गळ्यात तुळशीच्या माळा डोक्यावर तुळस, हातात टाळ-मृदंग घेऊन विद्यार्थ्यांची गोलाकार फेर धरून शाळेच्या आवारातून वारकरी दिंडी काढण्यात आली.
या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. राजवाडे, शालेय समिती अध्यक्ष श्री. पाटणकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच यावेळी पालक बंधू-भगिनीही बालवारकऱ्यांचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होते. “दिंडीचा कार्यक्रम अतिशय सुंदररित्या साजरा झाला,” असे कौतुक एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती शिल्पा पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे यांनी केले. या कार्यक्रमाचे नियोजन सर्व बालवाडी शिक्षक व सेविका यांनी मिळून केले. त्यामुळे हा कार्यक्रम आनंदात व उत्साहात पार पडला.



