मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हाशैक्षणिक

पिरंदवणे नं. १ शाळेच्या मुख्याध्यापकांचा केंद्रीय शिक्षण परिषदेत सन्मान 

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळावर आदर्श शिक्षक संतोष चव्हाण यांची वर्णी : डिंगणी केंद्राच्या वतीने अभिनंदन

संगमेश्वर : तालुक्यातील जि. प. पिरंदवणे नं. १ शाळेत सेवारत असणारे आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक संतोष चव्हाण यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळावर इ. ६ वी ते १२ वी पर्यंतच्या कार्यानुभव विषयाच्या समितीवर निवड झाली असून, याबद्दल त्यांचा डिंगणी गुरववाडी येथे पार पडलेल्या एप्रिल महिन्याच्या केंद्रीय शिक्षण परिषदेत शाल-श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

कोळंबे प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी शशिकांत त्रिभुवने, केंद्र प्रमुख मदन वाजे, माजी केंद्र प्रमुख संतोष मोहिते, केंद्र शाळेचे मुख्याध्यापक अमोल तोतला, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विशाल कदम, सुभेदार चाळके प्रतिष्ठानचे सचिव सुधीर चाळके, केंद्रातील अन्य शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

संगमेश्वर तालुक्यात एक उपक्रमशील शिक्षक म्हणून त्यांचा लौकिक आहे. शैक्षणिक साहित्य निर्मिती हा त्यांचा व्यासंग. आपल्या शैलीदार अध्यापन पद्धतीने अल्पावधीतच नवनियुक्त शिक्षकांसमोर त्यांनी दीपस्तंभाप्रमाणे आपले व्यक्तिमत्त्व स्थापित करून अनेकांना प्रेरणा दिली आहे.

परसबाग, बोलक्या भिंती, वैज्ञानिक प्रयोग, अंधश्रद्धा निर्मूलन विषयक प्रयोग यांसह अन्य अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. पिरंदवण्यासारख्या दुर्गम भागात १० वर्षांहून अधिक काळ काम करताना आव्हानात्मक परिस्थितीवर वेळोवेळी मात करत विद्यार्थीप्रिय शिक्षक आणि कार्यतत्पर मुख्याध्यापक अशी दुहेरी प्रभावी कामगिरी करणाऱ्या संतोष चव्हाण यांच्यावर आता शासनाने नवे दायित्व सोपवले आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!