जि. प. प्राथमिक शाळा वाटद खंडाळा शाळेतील विद्यार्थ्यांचे आयटीएसई परीक्षेत घवघवीत यश

खंडाळा : रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाटद खंडाळा येथील विद्यार्थ्यांनी भारतीय प्रज्ञाशोध परीक्षा (ITSE) २०२४-२५ मध्ये उज्ज्वल यश संपादन केले असून, इयत्ता तिसरीतील विद्यार्थ्यांनी आपल्या प्राविण्याची छाप सोडत शाळेचा व गावाचा गौरव वाढवला आहे.

या परीक्षेत रुद्र माधव अंकलगे याने जिल्ह्यात पाचवा क्रमांक पटकावला आहे. रुजिता प्रवीण सुर्वे केंद्रात प्रथम, तर राजवीर अमोल पाटील याने केंद्रात तृतीय क्रमांक पटकावला आहे.
या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. मंजुषा झगडे, उपाध्यक्ष व सर्व सदस्य, इतर समित्या, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक वर्गाने सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. या विद्यार्थ्यांच्या यशात मोलाचा वाटा असलेल्या मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती मंजुश्री पाटील यांचेही विशेष अभिनंदन करण्यात आले आहे.
शाळेच्या गुणवत्तेची ही ठळक पावती असून, हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे मत शिक्षक आणि पालकांनी व्यक्त केले.



