मनसेची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ उपप्रादेशिक अधिकारी कार्यालयावर धडक
प्रदूषणाबाबत जाब विचारतानाच कंपन्यांवर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

रत्नागिरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) २३ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकारी कार्यालयावर धडक देऊन संबंधित अधिकाऱ्यांसमोर विविध प्रश्न उपस्थित केले. ५ मे पर्यंत प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना कार्यालयास टाळे ठोकून आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला.
जिल्ह्याचे ठिकाण असून देखील येथे पूर्ण वेळ उपप्रादेशिक अधिकारी उपलब्ध नाही. त्यामुळे अनेक महाभागांना मोकळे रान मिळाले आहे. ते मिळाले आहे की जाणीवपूर्वक दिले आहे. रत्नागिरी एमआयडीसी परिसरातील काही कंपन्या प्रदूषित पाणी खाडी, समुद्रामध्ये सोडत असून यामुळे समुद्र, खाडी प्रदूषित होत आहेत. याचा मत्स्य प्रजाननावर परिणाम होत असून, मत्स्यउत्पादनात घट होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या कंपन्यांवर विरोधात आवाज उठवूनही प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने काय कारवाई करण्यात आली, असा सवाल उपस्थित केला.
दररोज संध्याकाळी शहरातील साळवी स्टॉपपासून परिसरात एक प्रकारचा घाणेरडा वास सुरू होतो. तो कोणत्यातरी मत्स्य प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यातून सोडला जातो. त्यावर देखील आजवर अनेक वेळा तक्रारी झाल्या, परंतु त्यावर काय कारवाई केली. त्याचप्रमाणे रत्नागिरी नगरपालिकेच्या हद्दीतील गटारांमधून प्रदूषित व कचरायुक्त सांडपाणी मांडवी खाडी समुद्रामध्ये सोडण्यात येत असून पालिकेवर काय कारवाई करणार, रत्नागिरी एमआयडीसी मध्ये स्वतःची प्रदूषित पाणी स्वच्छ करण्याची यंत्रणा नसल्यामुळे अनेक कंपन्या प्रदूषित पाणी खाडी समुद्रात सोडत आहेत. त्यामुळे एमआयडीसी विभागाला कशाप्रकारे सूचना देण्यात येणार, अशा अनेक प्रश्नांचा भडीमार मनसेकडून करण्यात आला.
लांजा तालुक्यामध्ये काही भागांमध्ये स्टोन क्रशर उभारण्यात आली असून, यामुळे गावातील जनतेला मनस्ताप होत असल्याची तक्रारकडे आल्याचे जिल्हाध्यक्ष सौंदळकर यांनी सांगितले. यावर संबंधित अधिकारी काहीच सुयोग्य देऊ शकले नाहीत. याउपर तुम्हीच आम्हाला अशा कंपन्याची नावे द्या आम्ही कारवाई करू, असे आश्वासन देऊ लागले. यावरून संबंधित विभाग फक्त शोभेचे बाहुले असल्याचे उपजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर यांनी सुनावले. ५ मे पर्यंत अशा कंपनीवर कारवाई न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना कार्यालयास टाळे ठोकून आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष अविनाश सौन्दळकर, उपाजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर, तालुकाध्यक्ष सचिन शिंदे, जिल्हा सचिव महेंद्र गुळेकर, शहरअध्यक्ष बाबय भाटकर, उपतालुकाध्यक्ष रूपेश चव्हाण, सतीश खामकर, महिला शहर अध्यक्ष सुश्मिता सुर्वे, शहर सचिव संपदा राणा, शैलेश मुकादम, गौरव चव्हाण इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.



