मुख्य बातमी

रत्नागिरी मनोरुग्णालयात मतिमंद युवकाला अमानुष मारहाण

जबड्याला दुहेरी फ्रॅक्चर : आईची चौकशीची मागणी 

रत्नागिरी : रत्नागिरी मानसिक आरोग्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या एका मतिमंद युवकावर अमानुष मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या मारहाणीत युवकाच्या जबड्याचे हाड दोन ठिकाणी तुटल्याने त्याची प्रकृती चिंताजनक झाली असून, नातेवाईकांनी मनोरुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप करत सखोल चौकशीची मागणी केली आहे.

मन्नान मुनाफ फणसोपकर (वय २५, रा. रत्नागिरी) हा मुलगा रत्नागिरी येथील आविष्कार संस्थेत शिकत असून सध्या शाळेला सुट्टी असल्याने तो घरी चिडचिडपणा करत असल्याने कुटुंबीयांनी त्याला मनोरुग्णालयात काही वेळ दाखल करण्याचा निर्णय घेतला होता.

या मतिमंद तरुणाला २५ मे रोजी मानसिक आरोग्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, ६ जून रोजी सकाळी ११ वाजता त्याला गंभीर अवस्थेत रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. येथे उपचारादरम्यान डॉक्टरांनी जबड्याला दोन ठिकाणी फ्रॅक्चर झाल्याचे निदान केले. रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याने तातडीने डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात हलवण्यात आले.

रुग्णाच्या आईने दिलेल्या निवेदनानुसार, रुग्णालय प्रशासनाने ना जखमी झाल्याची, ना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आल्याची कोणतीही पूर्वसूचना दिली नव्हती. तसेच, तिच्या आरोपानुसार मारहाण रुग्णालयातील वॉर्ड बॉय व नर्सिंग कर्मचाऱ्यांनी केल्याची शक्यता आहे. एवढ्या गंभीर जखमा कोणत्यातरी वस्तूनेच केल्या असाव्यात, असा संशयही नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. रुग्णालयात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, असे सांगण्यात आल्यामुळे घटना घडल्याच्या वेळेचे कोणतेही दृश्य उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णाच्या सुरक्षेच्या दृष्टीने रुग्णालय प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या प्रकारावर प्रतिक्रिया देताना रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. संघमित्रा फुले यांनी, “रुग्णावर इतर रुग्णाने मारहाण केली असावी किंवा तो बेडवरून पडला असावा”, अशी शक्यता व्यक्त केली. मात्र, फक्त दोन फूट उंचीच्या बेडवरून पडून जबड्याचे हाड तुटण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचे वैद्यकीय सूत्रांचे म्हणणे आहे.

दरम्यान, श्रीमती शरीफा मुनाफ फणसोपकर यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात लेखी निवेदन देऊन घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकारामुळे मानसिक रुग्णांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त होत असून, अशा संस्थांमधील पारदर्शकतेसाठी यंत्रणांनी ठोस पावले उचलण्याची गरज अधोरेखित होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!