मुख्य बातमी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा महामानव पुन्हा होणे नाही : संजय कदम

आबलोली (संदेश कदम) : “विश्वरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला संविधानाद्वारे समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व बहाल केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने माणसाला माणूस म्हणून जगण्याचे हक्क, कर्तव्य आणि अधिकार प्राप्त झाले असून ज्यांच्या कार्य कर्तृत्वा समोर भारत देशच नव्हे तर अखंड विश्वच नतमस्तक होते. असे युगप्रवर्तक, समाज नायक, बोधिसत्व, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा महामानव भारत देशातच काय, अवघ्या विश्वात देखील पुन्हा होणे शक्य नाही,” असे स्पष्ट मत मातोश्री लक्ष्मीबाई स्मृती मंच खेरशेत या कौटुंबिक सेवाभावी संस्थेचे मुख्य प्रवर्तक संजयराव शांताराम कदम यांनी केले.

भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा चिपळूण या संघटनेच्या वतीने विश्वरत्न, विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बहादूरशेख नाका, चिपळूण येथे आयोजित तीन दिवसीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला सांगता समारोह कार्यक्रम शहर शाखा अध्यक्ष महेंद्र कदम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच या सेवाभावी संस्थेचे मुख्य प्रवर्तक आणि सामाजिक कार्यकर्ते संजयराव शांताराम कदम हे मौलिक मार्गदर्शन करीत होते.

यावेळी संजयराव शांताराम कदम यांनी “कोटी कोटी उपकार तुझे, तू आंम्हाला माणसात आणले” ही कविता सादर केली. कदम यांच्या कवितेने टाळ्यांचा कडकडाट झाला. गेले दहा-बारा वर्षे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला आयोजित करत असलेली भारतीय बौद्ध महासभा, शहर शाखा चिपळूण या संघटनेच्या वतीने यावर्षी व्याख्यानमालेत बदल करून फक्त तीन दिवसीय व्याख्यानमाला आयोजित केली होती. पहिल्या दिवशी व्याख्याते म्हणून डीबीजे कॉलेजचे प्रा. के. एस. सावरे यांनी “राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर” या विषयावर डॉ. आंबेडकरांनी राष्ट्रनिर्मिती उभारणीसाठी जे योगदान दिले गेले त्याला या देशात तोड नसल्याचे नमूद करताना राष्ट्रनिर्मितीच्या अनुषंगाने त्यांनी केलेल्या कार्य कर्तृत्वाचा दाखला देत उपस्थितांना भारावून सोडले. श्री. सावरे यांच्या मार्गदर्शन व्याख्यानमालाचे शुभेच्छुक म्हणून मुख्याध्यापिका सविता मोरे यांनी शुभेच्छा परत्वे विचार व्यक्त केले.

दुसऱ्या दिवशी जिल्हा संस्कार विभागाचे आयु. अल्पेश सकपाळ यांनी “डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांचे गुरु” या विषयावर व्याख्यान दिले. शुभेच्छुक डीबीजे कॉलेजचे निवृत्त प्राचार्य मेजर संजय गवाळे यांनी या विषयावर आपले मनोगत व्यक्त करून भरभरून शुभेच्छा दिल्या. तिसऱ्या दिवसाचे विचारपुष्प गुंफताना आयु. सुनील शिवगण यांनी “बुद्धगया व सद्य:स्थिती” या विषयावर प्रबोधनात्मक मार्गदर्शन करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी कोषाध्यक्ष भाऊ कांबळे, सरचिटणीस किरण कदम नंदकुमार बनसोडे व उपाध्यक्ष अशोक नाईक, सचिव सर्वश्री प्रकाश पवार, दीपक कदम, अक्षय कांबळे, देवेंद्र आठवले, डॉ. चंदनशिवे तसेच संघटक अनिकेत कांबळे, के. डी. मोहिते आणि प्रा. सुधीर मोरे समवेत वैष्णवी कांबळे, सरिता जाधव, सुनंदा कदम, प्राची मोहिते आणि महिला तालुका कोषाध्यक्ष शारदा चंदनशिवे, शहर शाखा महिला अध्यक्ष क्रांती कदम, महिला शहर शाखा सरचिटणीस दिशा कदम आदींनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. यावेळी सहाय्यक गटविस्तार अधिकारी बी. डी. कांबळे, स्मिता संजय गवाळे (वंचित बहुजन पक्ष, राष्ट्रीय संघटक) आणि माजी प्राचार्य मेजर संजय गवाळे यांची विशेष उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!