राष्ट्रनिर्माते समाजसुधारक : महात्मा जोतिराव फुले

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेक महनीय व्यक्तींनी सहभाग घेतला होता. त्यातील प्रत्येकांनी देशासाठी आणि देशवासीयांसाठी आपले सर्वस्व अर्पण केले आणि भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करतानाच भारतीय समाजमनात स्वातंत्र्याचे आणि विकासात्मक दृष्टिकोनाचे महत्त्व रुजविले. अशावेळी इंग्रजांनी भारतीयांवर लादलेल्या गुलामगिरीच्या विरोधात अनेकांनी आवाज उठवला. त्यामुळे या गुलामगिरीला नष्ट करता आले; परंतु इंग्रज सरकारच्या सुरुवातीच्या काळात किंवा त्याच्या अगोदरपासून भारतातील सर्वच सर्वसामान्य आणि बहुजन लोकांच्या मनात प्रथा, परंपरा, अंधश्रद्धा, वर्णव्यवस्था इत्यादीच्या जोखडाने, निर्माण झालेल्या मानसिक गुलामगिरीतून, भारतीयांची मुक्तता व्हावी यासाठी अनेकांनी अनेक प्रकारे प्रयत्न केले. विविध चळवळींच्या माध्यमातून ह्या जीवघेण्या गुलामगिरीतून मुक्तता व्हावी यासाठी निरंतर प्रयत्न केले. त्यामध्ये ज्यांचा उल्लेख राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी “देश के पहले महात्मा, वो ही असली महात्मा है” असा केला होता, ते पहिले महात्मा आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्यांना आपले गुरू मानले असे महनीय व्यक्तिमत्व म्हणजे देशाच्या राष्ट्रनिर्माणासाठी सदैव तत्पर असणारे समाजसुधारक महात्मा जोतिराव फुले.
महाराष्ट्राच्या समाजसुधारकांच्या पहिल्या पिढीतील तथा समाजाच्या शोषितांच्या, वंचितांच्या, सर्वसामान्यांच्या गुलामीची कारणमिमांसा करणारे क्रांतिकारक विचारवंत आणि देशाची भविष्यात प्रगती करण्याची असेल तर त्यासाठी राष्ट्रनिर्माणाची स्वप्ने पाहत, ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र झटणारे आणि आपल्या नि:स्वार्थी कृतीतून सर्वांनाच आदर्शवत कार्य करणारे समाजसुधारक म्हणजे महात्मा फुले. त्यांचे संपूर्ण जीवन, त्यांचे सामाजिक कार्य, समाजमनाचा आढावा घेत समाजातील वाईट चालीरीती, प्रथा, अनिष्ट परंपरा यांच्यावर आपल्या विचारांचा आसूड ओढणारी त्यांची लेखणी आणि त्यांवर कृतीयुक्त कष्ट करण्याची तयारी यासाठी महात्मा फुले हे आजही विचारांच्या रूपाने प्रत्येकाच्या मनात आहेत. म्हणूनच एकोणिसाव्या शतकातील महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वांमध्ये त्यांचा समावेश होतो; नव्हे तर त्यांच्या सामाजिक परिवर्तनातील प्रचंड कार्यामुळे त्यांची दखल जगाने घेतली असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. आज ११ एप्रिल. आज महात्मा जोतिराव फुले यांची १९८ व्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या विचारांना आणि त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाला मनःपूर्वक अभिवादन!
महात्मा जोतिबा फुले यांनी आपले व्यक्तिमत्व स्वयंप्रेरणेने आणि स्वतःच्या प्रयत्नांनी घडविले होते. समाजसेवेसाठी, नवीन राष्ट्रांच्या उभारणीसाठी ध्येयाने भारून जाऊन समाजात आमूलाग्र बदल घडविणारे महात्मा फुले हे थोर महापुरुष होते. आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा समाजासाठी, सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी त्यांनी वेचले. त्यामुळेच ज्या काळात मुलींना ठरविण्यात आलेल्या ठराविक चौकटीतच जगावे लागते होते. त्यांना ती चौकट मोडून बाहेर काढत त्यांना शिक्षणाचे धडे दिले. त्यातूनच उज्जवल भविष्याची सुरुवात केली. ज्यामुळे आज भारतात स्त्रिया या सर्व क्षेत्रात अग्रेसर असण्याचे महत्त्वाचे कारण हे नक्कीच या त्यागात आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.
सातारा जिल्ह्यातील काही गावची वतनदारी जोतिबा फुले यांच्या पूर्वजांकडे होती; परंतु ज्या भागाची वतनदारी होती, तेथे सततचा दुष्काळ पडायचा. त्यामुळे त्यांच्या पूर्वजांनी पुण्याची वाट धरली. तेथे जाऊन ते फुलांचा व्यवसाय करू लागले. म्हणून त्यांचे गोऱ्हे हे आडनाव बदलून त्यांवर फुले हे आडनाव कायम झाले. अशातच जोतिबांच्या दिनांक ११ एप्रिल १८२७ मध्ये गोविंदराव आणि चिमनाबाई यांच्या पोटी जन्म झाला. दुर्दैवाने जोतिरावांच्या लहानपणी त्यांच्या आईचे निधन झाले, त्यावेळी त्यांचा सांभाळ गोविंदराव यांनी अतिशय काळजीपूर्वक केला.
जोतिरावांच्या जन्मापर्यंत एका ठराविक वर्गशिवाय इतरांना शिक्षण घेण्याची बंदी होती किंवा त्यांना शिकण्याचा अधिकार नव्हता; परंतु गोविंदरावांनी मात्र जोतिराव यांचे शिक्षण इंग्रजी माध्यमाच्या शाळेत केले. त्यामुळे त्यांना अगदी लहानपणापासूनच शिक्षणाची आवड निर्माण झाली. याच काळात आपल्या अतुलनीय बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी इंग्रजी भाषेचे ज्ञान आत्मसात केले. यादरम्यानच्या काळात त्यांचा विवाह खंडाळा तालुक्यातील नायगाव येथील खंडूजी नेवसे पाटील यांची कन्या सावित्रीबाई यांच्याशी झाला.
कोणत्याही उत्तुंग कार्याची सुरुवात ही स्वतःपासून आणि स्वतःच्या घरापासून केल्यास त्या कार्यांची विशालता वाढते. त्याप्रमाणे जोतिरावांनी सर्वप्रथम सावित्रीबाई यांना शिक्षणाचे धडे दिले. त्याचमुळे त्या जोतीरावांच्या समाजसुधारणेचेच्या माध्यमातून आणि लोकशिक्षणाच्या जोरावर राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात अपमान, कमीपणा, मानहानी सहन करत शेवटपर्यंत कार्यरत राहिल्या. याच प्रेरणेतून मानवी हक्कांच्या आधारावर निर्माण झालेल्या नव्या भारतीय समाजरचनेच्या स्थापनेसाठी आणि जातीभेद, धर्मभेद यांना धिक्कारणारी विचारसरणी जोतिरावांनी सांगितली. त्या काळातच नव्हे तर आजच्या काळात देखील या विचारसरणीचा फार मोठा परिणाम भारतीय जनमानसावर आहे. यामागील प्रेरणा सांगायची झाल्यास जोतिरावांनी आपल्या शिक्षणाच्या दरम्यान आणि त्यानंतरच्या काळात जगाचा, विशेषतः पश्चिमी राष्ट्रांचा आणि भारताचा प्राचीन – अर्वाचीन काळाचा इतिहास अभ्यासला. याच काळात त्यांनी अनेक पाश्चात्य विचारवंताच्या साहित्याचा अभ्यास केला. अमेरिकन राज्यक्रांतीच्या इतिहासाची तर त्यांच्या मनावर खोल छाप होती. त्यामध्ये त्यांच्या आयुष्यात विचारप्रवाह निश्चित करण्यासाठी थॉमस पेन यांच्या द राईट्स ऑफ मॅन या आणि त्यांच्या इतर ग्रंथाचा खूप उपयोग झाला. अत्यंत बिकट परिस्थितीत थॉमस पेन यांनी मार्ग शोधला, त्याच प्रमाणे जोतिरावांनी आपली वाटचाल निश्चित केली. या सर्वांचे आणि भारतीय मानसिक गुलामगिरीने ग्रस्त झालेल्या समाजमनाचे त्यांनी नियमित चिंतन, मनन केले. त्यातून ते प्रगल्भ बनत गेले. याच प्रगल्भतेतून त्यांच्यातील कृतिशील विचारवंताची घडण बनत गेली. याद्वारे आपल्या कार्याचा मार्ग ठरवून त्याप्रमाणे कृती केली. याच कृतीच्या जोरावरच त्यांनी प्रस्थापितांच्या विरोधात बंड केले. त्यामुळे त्यांना तत्कालीन विचारसरणीने इंग्रजधार्जिणे ठरवले. त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप केला. त्यांची जिवंतपणी अंत्ययात्रा काढली. ज्या पत्नीच्या सहकार्याने त्यांनी लक्षणीय आणि परिवर्तनाचे कार्य केले, त्यांनाच किती तरी वेळा या जातीय आणि द्वेषमूलक विरोधाचा सामना करावा लागला. तरीही जोतिरावांनी आपला मार्ग बदलला नाही. याकाळात जोतिरावांनी आपल्या स्वतःपुरता विचार केला असता तर नक्कीच ते, सावित्रीबाई आणि कुटुंबातील सर्व सदस्य आरामात जगू शकले असते; परंतु जोतिरावांनी हा मार्ग न निवडता सर्वसामान्य आणि पीडित लोकांसाठी आपले आयुष्य वेचले. याच कृतीशीलतेचे वर्णन करताना य. दि. फडके म्हणतात की, “जोतिराव हे कोणी साहित्याचार्य, भाषाचार्य वा इतिहासकार किंवा मोठे धर्मवेत्ते नव्हते. तर ते एक आपल्या राष्ट्रनिर्माणसाठीचे कृतिशील आणि चिकित्सक विचारवंत होते.”
आजपर्यंत आपण त्यांना शिक्षणाचे प्रणेते, विविध प्रकारचे समाजसुधारणा करणारे समाजसुधारक म्हणत असतो. असे म्हणणे म्हणजे त्यांच्या अफाट कार्याला बंदिस्त करण्यासारखे आहे. कारण महात्मा फुले यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात शिक्षण, समाजसुधारणा यासोबतच विविध क्षेत्रात खूप मोठे योगदान दिले. आज प्राथमिक वा माध्यमिक शाळांमधून दिली जाणारी शालेय पोषण आहार योजनेचा संकल्प जोतिरावांनी केला होता. तसेच शेतकर्यांचीच नव्हे तर सर्व भारतीयांच्या मुलांना/ मुलींना मोफत शिक्षण आणि सक्तीचे करण्यात यावे, असा लिखित स्वरूपात आग्रह हंटर कमिशनसमोर धरणारे ते आशियातील पहिलेच शिक्षणतज्ञ होते. मुलींना शाळेत टिकविण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी करावी अशी मागणी देखील त्यांनी केली होती. त्यापलीकडे जाऊन त्यांनी शाळांमध्ये औद्योगिक शिक्षण(आताचे ITI) आणि शेती (आताचे AGRI) शिक्षण देणे काळाची गरज आहे हे पटवून देण्यासाठी त्यांनी हा प्रयोग आपल्या सर्व शाळांमधून केला. याबाबत ते असे म्हणतात की”Industrial department should be attached to the school’s in which children learn useful trades and crafts and be able on leaving school to maintain themselves comfortably and independently” आणि याची यशस्वीता इंग्रज सरकारच्या निदर्शनास आणून दिली. तसेच त्यांनी प्रौढ शिक्षण वर्ग देखील सुरू केले. म्हणजेच आजच्या शिक्षणातील विविध सुधारणा ह्या आजपासून १३० वर्षांपूर्वी महात्मा फुले सांगत होते.
एवढेच कशाला शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय असल्याने शेतीत सुधारणा करून शेतकऱ्यांना जगविले पाहिजे, तरच आपल्या देशाचे भवितव्य उज्जवल असेल असे त्यांनी त्यावेळी इंग्रज सरकारला कळवले होते. त्यासोबतच शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्यांनी इंग्रज सरकारसमोर त्रिसूत्री मांडली–
१. शेतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी शेतीला मोठ्या आणि मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध करुन घ्यावे. यासाठी ज्या – ज्या जागी शक्य असेल तेथे तेथे छोट्या वा मोठ्या स्वरूपाची धरणे, तलाव, बंधारे उभारले पाहिजे.
२. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारायची असेल, तर त्यांना शेतीसोबतच उद्योग व्यापाराची जोड दिली पाहिजे. आणि हा उद्योग व्यापार करण्यासाठी शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण दिले पाहिजे, जेणेकरून त्यांना शेती आणि जोडधंदा ही आधुनिक पद्धतीने करता येईल.
३. त्यासोबतच आर्थिक सुधारणा व्हाव्यात यासाठी शेतीतून निघणाऱ्या शेतमालाला कायम हमीभाव मिळाला पाहिजे.
या त्रिसूत्रीचा स्वीकार इंग्रज सरकारने करावा यासाठी जोतिरावांनी खूप प्रयत्न केले. त्यांचे हे विचार आजही आपल्या देशातील शेतीसाठीच आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. १३० वर्षांपूर्वी जोतिरावांनी दिलेले हे विचार आजच्या काळात देखील उपयुक्त आहेत. त्यापुढे जाऊन सांगायचे असेल तर आज अनेक राजकिय संघटना वा व्यक्ती वरील बाबी शेतकऱ्यांना मिळाव्यात यासाठी खूप मोठे आंदोलन करत आहेत.
जोतिरावांनी आपल्या आयुष्यात लेखनाच्या माध्यमातून शोषितांच्या, वंचितांच्या अधिकारावर येणाऱ्या मर्यादा यांच्यावर सडेतोड लेखन केले. तसेच त्यांच्यासाठी आपल्या लेखनाच्या माध्यमातून सुधारणेचे नवनवीन मार्ग दाखवले. त्यांनी अज्ञान, अंधश्रद्धा, पिळवणूक, जातीयता, स्पृश्य – अस्पृश्यता यावर जोरदार हल्ला केला. त्याचा परिणाम हा झाला की जेंव्हा भारतात केशवपनची अत्यंत विघातक चाल होती, त्याविरोधात जोतिरावांनी आवाज उठवला आणि न्हाव्यांचा संप घडवून आणत या चालीवर आळा घातला. तसाच प्रकार सतीची चाल, बालविवाह, विधवा व पुनर्विवाह बंदी या सर्व क्रूर रूढी कायद्याने बंद करण्यात राजा राममोहन रॉय यांच्यानंतर जोतिरावांनी पुढाकार घेत असे स्त्रियांचे पुनर्वसन केले. बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. एवढेच नव्हे तर त्यातील काशीबाई नावाच्या महिलेच्या मुलाला (यशवंत) त्यांनी दत्तक घेतले. ते याबाबत आपल्या अखंड मध्ये असे म्हणतात की, “निर्मिके निर्मिला मानव, कमी जास्त सूत्र, बुद्धिमध्ये!” म्हणजे निर्मिकाने सर्वांनाच सारखेच बनवले; परंतु मानव मात्र तसे मानायला तयार नाही. हा जगातील सर्वात मोठा धर्मनिरपेक्ष विचार जोतिरावांनी समाजाला दिला. हा विचार आजही आत्मसात समाजाने केला तर जातीय तेढ, दंगली, हिंसाचार थांबून देश सुजलाम सुफलाम होण्यास नक्कीच मदत होईल. मंदिर, मशीद वा धर्माच्या नावावरील तांडव थांबेल.
जोतिराव हे आयुष्यभर भारताच्या अखंडतेसाठी, भारतीयांच्या विकासासाठी सतत झुंजत राहिले. यासाठी त्यांच्यावर अनेकदा जीवघेणे हल्ले देखील झाले; पण जोतिरावांनी कधीही निर्मिकांनी सांगितलेला सत्याचा मार्ग सोडला नाही; उलट ते आयुष्यभर विनावेतन आणि विनामोबदला काम करत राहिले. जातिनिर्मूलन, सर्वांना मोफत शिक्षण, स्त्री पुरुष समानता, नैसर्गिक साधन संपत्तीचे समान वाटप आणि धर्मचिकित्सा ही पंचसूत्री त्यांनी भारताच्या उत्थानासाठी भारतीयांचा समोर मांडल्या. वरील मुद्द्यांच्या आधारे समाजव्यवस्था निर्माण झाली तर खैरलांजी, कोपर्डी, निर्भया, नितीन आगे वा इतर धार्मिकतेचा उन्मादाचे प्रकरणे घडली नसती. उलट समाज एकसंघ राहिला असता आणि बंधुभाव वाढीस लागला असता.
तत्कालीन काळात त्यांना अगदी नामांकित लोकांकडून खूप विरोध झाला. तरीही त्यांनी आपला मार्ग बदलला नाही, उलट ते विविध उपक्रमाच्या माध्यमातून लोकांच्या मनातील गुलामगिरी नष्ट करत प्रयत्न करत राहिले. उदाहरण म्हणजे रायगडावर जाऊन त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध घेत लोकांना एकत्र करत, छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली. त्यांच्यावर अजरामर पोवाडा लिहीत शिवचरित्राचे लेखन केले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यांनी विविध विषयांवर फक्त लेखन केले नाही, ते जे पुस्तकात लिहोले आहे ते प्रत्यक्षात आणले आणि त्यातून मिळणाऱ्या रक्कमेतून समाजबांधणी करण्याचे कार्य केले आहे. अशावेळी त्यांचे विरोधक म्हणत असत की, त्यांना इंग्रजाकडून आर्थिक मदत मिळायची; पण तसे नव्हते तर जोतीराव हे स्वतः खुप मोठे उद्योजक होते. आताच्या भाषेत बिल्डर होते. त्यांनी आपल्या कन्स्ट्रक्शन कंपनीच्या माध्यमातून मोठी-मोठी बांधकामे केली आहेत. त्यामध्ये मुंबई महानगरपालिकेची मुख्य इमारत, भायखळा पूल आणि परळचे रेल्वे वर्कशॉप, मुंबईतील अनेक कापडगिरण्या, भंडारदरा जलाशय, बडोद्याचा सयाजीराव गायकवाडांचा लक्ष्मीविलास राजवाडा, अनेक पुल, बोगदे आदींची बांधकामे महात्मा फुले यांनी केलेली आहेत. राजू बाबाजी वंजारी यांनी मुंबईतील टाइम्स ऑफ इंडियाची इमारत, सोलापूरची लक्ष्मी विष्णू मिल आणि लक्ष्मीदास खिमजी यांच्या मुंबईतील कापड गिरण्या बांधल्या. म्हणून जोतीराव हे स्वतः यशस्वी उद्योजक, कार्यकरी संचालक, अर्थतज्ज्ञ होतेच; पण ते अनेक विषयांचे जाणकार होते.
ते नेहमी कष्टाला महत्त्व देत असत, जुगार मटका वा तत्सम तात्काळ आणि विनाश्रम पैसे मिळविण्यास त्यांचा विरोध होता. लबाडी, फसवणूक करून मिळविलेल्या पक्वांनापेक्षा कष्टांची भाकरी चांगली, असा त्यांचा लोकोपयोगी अर्थशास्त्र संकल्प होता. हा संकल्प आज जर प्रत्यक्षात आला तर नक्कीच देशातील भ्रष्टाचार कमी होईल. त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक पदे भूषविली. फक्त भूषविली नाहीत तर त्या – त्या पदाची प्रतिष्ठ वाढविली. फक्त अज्ञानाच्या जोरावर तुम्हाला काहिही मिळणार नाही. तर त्यासाठी तुम्हाला बुद्धिनिष्ठ श्रद्धा ठेवण्याची त्यांची विचारधारा आज आजमावण्याची आवश्यकता आहे. “अज्ञानाशी ज्ञान, पांगळ्याना अन्नदान, हेच बा स्मरण, निर्मिकचे!” ही त्यांची पद्धत अवलंबीने काळाची गरज आहे. त्यांच्या याच विचारामुळे महात्मा जोतिराव फुले हे थोर समाजक्रांतिकारक आहेत असे मत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मांडले तर बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी तर त्यांना भारताचे बुकर टी वॉशिंग्टन असे म्हटले आहे.
अशा या महामानवाची आज जयंती आहे. सध्या त्यांना व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारताचा सर्वोच्च भारतरत्न हा पुरस्कार देण्याच्या हालचाली मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. त्यांना तो काळाच्या ओघात मिळेल देखील; पण त्यापेक्षाही ते करोडो भारतीयांच्या मनात कायम आहेत हे महत्त्वाचे आहे. आयुष्यभर त्यांनी विषमतेच्या आणि नैराश्येच्या विरोधात लढा दिला; पण त्यांची आणि सावित्रीबाई यांचीही जीवनाच्या अखेर आणि मरणोत्तर समाजाने खूप आवेहलना केली. पण जगाच्या पाठीवर आपल्या उण्यापुऱ्या आठ वर्षाच्या काळात समाज, शिक्षण, अज्ञान, विकास, परिवर्तन या सर्व आघाड्यांवर लढताना कधीही आपली नैतिकता सोडली नाही वा स्वतःच्या चुका लपविण्यासाठी विचारांना तिलांजली दिली नाही. तसेच कधीही कुणाशीही तडजोड केली नाही. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक वा सांस्कृतिक क्षेत्रात त्यांच्यावर अनेकदा घातक प्रसंग आले; संत तुकाराम महाराजांच्या “सत्य – असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही, बहुमता!” याप्रमाणे त्यांनी कधीही आपला मार्ग बदलला नाही. अनेकदा समोर काळाकुट्ट अंधःकार पसरला असतानाही त्यांनी कधीही नाहक इकडून तीकडे उड्या मारल्या नाहीत. दुसऱ्याचा प्रकाश घेण्याचा प्रकार केला नाही.
धर्म राज्य भेद मानवा नसावे l
सत्याने वागावे l इशासाठी ll
ख्रिस्त महंमद मांग ब्राह्मणांसी l
धरावे पोटाशी l बंधुपरी ll
निर्मिकाचे धर्म सत्य आहे एक l
भांडणे अनेक l कशासाठी ll
हे त्यांचे समतेचे, विश्वबंधुत्वाचे विचार आज समाजातील तरुण – तरुणी, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि महत्त्वाचे म्हणजे राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी आत्मसात केले तर भारत नक्कीच महासत्ता होईल. फक्त महात्मा फुले यांच्यासह सर्वच राष्ट्रपुरुषांना एक जातीत, पंथात, धर्मात न मर्यादित ठेवता त्यांना वैश्विक करणे हेच त्यांच्या विचारांना अभिवादन ठरेल. पुन्हा एकदा त्यांच्या कार्याला त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
– श्री. माधव विश्वनाथ अंकलगे
मु. पो. वाटद खंडळा, ता. जि. रत्नागिरी
संपर्क – ९७६४८८६३३०/ ९०२१७८५८७४



