आरोग्यमुख्य बातमी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रत्नागिरी येथे पायाची कृत्रिम सांधेरोपण’ शस्त्रक्रिया यशस्वी

पहिल्या शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्या पायावर देखील यशस्वी शस्त्रक्रिया

रत्नागिरी : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने वैद्यकीय क्षेत्रात आणखी एक महत्त्वपूर्ण यश संपादन केले आहे. डॉक्टरांच्या पथकाने श्रीम. रंजना रमाकांत जोशी (वय ६८, रा. मारुती मंदिर, रत्नागिरी) यांच्यावर पायाची कृत्रिम सांधरोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. या यशाबद्दल रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी उदय सामंत प्रतिष्ठानचे विशेष आभार मानले आहेत, ज्यांच्या योग्य मार्गदर्शन आणि सहकार्यामुळे ही मोफत शस्त्रक्रिया शक्य झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीम.रंजना रमाकांत जोशी यांना गेल्या १५ वर्षांपासून वातामुळे गुढघेदुखीचा त्रास होता. तसेच दोन्ही पायांना बाक असल्यामुळे उभे राहणे व आधाराशिवाय चालता येणे शक्य नव्हते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रत्नागिरी येथे अस्थिरोग तज्ञ डॉ. निखिल देवकर यांनी डाव्या पायाची कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केली होती. त्यानंतर १७ मे २०२५ रोजी उजव्या पायाचीदेखील कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली.

शस्त्रक्रियेनंतर दोन दिवसांनी या रुग्णास चालणे फिरणे शक्य झाले. तसेच पायाचा बाक नाहीसा झाल्यामुळे चालणे अगदी सुलभ सोपे झाले. दोन्ही पायाची किचकट व खर्चिक अशी कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया उदय सामंत प्रतिष्ठानच्या सहकार्यामुळे पार पडली.

श्रीम. रंजना जोशी यांनी रुग्णालयात मिळालेल्या योग्य सेवेबद्दल समाधान व्यक्त केले आहे. त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रत्नागिरीचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद सांगवीकर, अस्थिरोग तज्ञ डॉ. निखिल देवकर, भूलतज्ञ डॉ. विनोद कानगुले आणि रुग्णालयातील सर्व कर्मचारी तसेच उदय सामंत प्रतिष्ठानचे महेश सामंत, सागर भिंगारे यांचे मनापासून आभार मानले आहेत.

या यशामुळे रत्नागिरीतील शासकीय वैद्यकीय सुविधांची गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध झाली असून सामान्य नागरिकांना मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या शासनाच्या आणि सामाजिक संस्थांच्या प्रयत्नांना त्यामुळे बळकटी मिळाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!