मुख्य बातमीशैक्षणिक

पटवर्धन हायस्कूलमध्ये दहावी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात

रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या पटवर्धन हायस्कूल येथे दहावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ सोमवारी (२६ मे) रोजी दुपारी ३ वाजता कॅप्टन ठाकूर सभागृहात उत्साहात पार पडला. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करण्यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत शिक्षण मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार साळवी होते. प्रमुख अतिथी म्हणून उपजिल्हाधिकारी जीवन देसाई यांनी उपस्थिती दर्शवली. प्रमुख अतिथींचे स्वागत श्रीमती वेल्हाळ यांनी शाल व श्रीफळ देऊन केले, तर परिचय श्रीमती गाडगीळ यांनी करून दिला. या वेळी विनायक हातखंबकर, श्री. कदम, संतोष कुष्टे, श्रीराम भावे, माजी उपमुख्याध्यापक वसंत आडर्ये व इतर मान्यवर संस्था पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. मुख्याध्यापिका श्रीमती जानकी घाटविलकर यांनी प्रास्ताविक करत विद्यार्थ्यांच्या यशाची माहिती दिली. दहावीचा निकाल ९८.४७ टक्के लागला असून, ३० विद्यार्थ्यांनी ९० टक्के पेक्षा अधिक गुण मिळवले. विशेष म्हणजे, वेदांग कुलापकर व पूर्वा माईणकर यांनी १०० टक्के गुण मिळवून शाळेच्या गुणवत्तेची उंची वाढवली. त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

विद्यार्थ्यांच्या मनोगतात वेदांग, पूर्वा आणि स्वरूपा नागवेकर यांनी आपल्या यशाचे श्रेय शिक्षक, पालक आणि संस्थेला दिले. ते म्हणाले, “अ आ इपासून सुरुवात केली आणि आज १०० टक्के गुण मिळवले, यामागे सर्वांचे मोलाचे योगदान आहे.”

बक्षीस वितरणाचे वाचन श्रीम. प्रतिभा बंडबे यांनी केले. प्रमुख पाहुणे व अध्यक्षांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीसे प्रदान करण्यात आली. शाळेतील प्रथम क्रमांक व १०० टक्के गुण प्राप्त विद्यार्थ्यांचा प्रमुख अतिथी जीवन देसाई यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. द्वितीय क्रमांक प्राप्त श्रावणी नाईक हिचाही विशेष सत्कार करण्यात आला. संस्कृत विषयात ५ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले.

प्रमुख अतिथी श्री. देसाई यांनी मुख्याध्यापक श्रीमती वेल्हाळ या १२२ वर्षांच्या शाळेतील पहिल्या महिला मुख्याध्यापक असल्याचे विशेष कौतुक करत शाळेच्या प्रगतीचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी पुढील शिक्षणासाठी योग्य निर्णय घ्यावा, आपली आवड व क्षमता ओळखून व्यक्तिमत्त्व विकासावर भर द्यावा, असा मार्गदर्शक सल्ला दिला. “ज्ञान, कौशल्य व योग्य दृष्टिकोनामुळे यश मिळते,” हा मूलमंत्र त्यांनी दिला.

अध्यक्षीय भाषणात श्री. साळवी यांनी शाळेच्या उज्ज्वल परंपरेचा गौरव केला. बालवर्गापासून सीनियर कॉलेजपर्यंत संस्थेची कामगिरी उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले.

रूपेश पंगेरकर यांनी आभार प्रदर्शन करत पालक, विद्यार्थी, मान्यवर पाहुणे, संस्था पदाधिकारी यांचे मन:पूर्वक आभार मानले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा. शिक्षिका श्रीमती हेमलता गुरव यांनी समर्थपणे पार पाडले. संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडल्याने उपस्थित पालक व विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. बक्षीस वितरण कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक प्रमुख श्रीमती गाडगीळ यांनी समर्थपणे पार पाडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!