मुख्य बातमी

चिपळूणमध्ये ‘जनगणना २०२७’ फील्ड ट्रेनर्सच्या तीन दिवसीय प्रशिक्षणास सुरुवात

देशातील पहिली 'डिजिटल' जनगणना : मोबाईल ॲप आणि पोर्टलद्वारे होणार माहिती संकलन

रत्नागिरी : देशातील सोळाव्या आणि स्वातंत्र्यानंतरच्या आठव्या जनगणनेची प्रक्रिया आता खऱ्या अर्थाने वेग घेऊ लागली आहे. जनगणना २०२७ च्या पूर्वतयारीचा भाग म्हणून चिपळूण पंचायत समितीमधील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात फील्ड ट्रेनर्ससाठी आयोजित तीन दिवसीय प्रशिक्षणाचे उद्घाटन सोमवारी झाले.

प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन चिपळूणचे तहसीलदार प्रवीण लोकरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मास्टर ट्रेनर म्हणून मंडणगडचे तहसीलदार अक्षय ढाकणे व राजापूरचे तहसीलदार विकास गंबरे उपस्थित होते. तसेच जनगणना समन्वय अधिकारी संजीव गावकर, सहाय्यक महसूल अधिकारी संभाजी ढेंबरे आणि तांत्रिक सहाय्यक अमोल करंडे यांनीही या सत्राला उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

यंदाच्या जनगणनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल असणार आहे. प्रशिक्षणादरम्यान फील्ड ट्रेनर्सना सविस्तर मार्गदर्शन दिले जात आहे.

यामध्ये मोबाईल ॲपचा वापर म्हणजे प्रगणक प्रत्यक्ष क्षेत्रात जाऊन ॲपद्वारे माहिती कशी नोंदवावी, प्रश्नांची हाताळणी यामध्ये नागरिकांना विचारण्यात येणाऱ्या ३३ प्रश्नांची अचूक उत्तरे मिळवण्यासाठीचे कौशल्य, आणि सीएमएमएस पोर्टल यामध्ये संपूर्ण माहिती संकलनाचे नियंत्रण या पोर्टलद्वारे केले जाणार आहे.

ही जनगणना ‘घरयादी व घरगणना’ आणि ‘लोकसंख्या गणना’ या दोन टप्प्यांत पार पडणार आहे.

१ मे ते १५ मे या कालावधीत नागरिकांना ‘स्वगणनेची’ (Self-Enumeration) सुविधा असून, १६ मे ते १४ जून प्रगणक घरोघरी जाऊन माहिती संकलित करणार आहेत.

यंदा प्रथमच जातनिहाय माहिती संकलित केली जाणार असून, डिजिटल माध्यमामुळे ही प्रक्रिया अधिक अचूक, जलद आणि पारदर्शक होईल. शिक्षकांची प्रगणक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, फील्ड ट्रेनर्सच्या माध्यमातून त्यांना सक्षम केले जात आहे.

जिल्हास्तरावर सुरू असलेल्या या प्रशिक्षण साखळीत आता फील्ड ट्रेनर्स तयार केले जात आहेत. हे ट्रेनर्स पुढे प्रगणक आणि पर्यवेक्षकांना प्रशिक्षित करतील. या प्रक्रियेत प्रामुख्याने शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून, ते प्रत्यक्ष घरोघरी जाऊन माहिती संकलनाचे काम करणार आहेत. या प्रशिक्षणामुळे आगामी जनगणनेचे कार्य अधिक प्रभावीपणे पार पडेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!