प्रधान डाकघर येथे डाकघर निर्यात केंद्र सुरू

रत्नागिरी : येथील प्रधान डाकघर येथे डाकघर निर्यात केंद्र सुरू झाले असून यांचा फायदा लघु उद्योजकांनी घ्यावा. त्याचप्रमाणे येणाऱ्या नाताळ व नवीन वर्षाच्या शुभेच्छा पोस्ट कार्यालयामार्फत उपलब्ध करण्यात आली असून या सेवेचाही लाभ नागरिकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन अधीक्षक डाकघर अ. द. सरंगले यांनी केले आहे.
भारत सरकार आता लोकल ग्लोबल माध्यमातून छोट्या उद्योजकांना निर्यात करण्यासाठी प्रवृत्त करीत आहे. अशा छोट्या उद्योजकांना निर्यातीसाठी मार्गदर्शनसुद्धा पोस्ट कार्यालयामार्फत मिळू शकते. यावर्षी दिवाळीमध्ये परदेशातील आप्त स्वकीयांचे व मुलांचे तोंड फराळाने गोड केले. दिवाळीमध्ये जिल्ह्यातून एकूण ४० पार्सल विविध बारा देशांत पाठविण्यात आली. खासगी कुरीअरचा विचार करता पोस्ट कार्यालयाचे दर अगदी वाजवी असून सामान्य माणसाच्या खिशाला परवडणारे आहेत.
शैक्षणिक कालावधीमध्ये पालक काटकसर करून मुलांचे शिक्षण पूर्ण करीत असतात. अशा परदेशी शिक्षणाचा खूपच खर्च असतो. एवढे असूनही मुलांना घराचा, प्रेमाचा खाऊ मिळावा ही पालकांची इच्छा असते. परंतु खूप मोठे दर पाहता इच्छा असूनही पालक ते करू शकत नाहीत. डाक विभागाने ही सेवा नवीन स्वरुपात सुरू केली असून, कमीतकमी खर्चात आपण आपली भेटवस्तू आणि अन्य घरगुती उपयोगाचे साहित्य परदेशी पाठवू शकता, अशी माहिती अधीक्षक डाकघर सरंगले यांनी दिली.



