शिकारीसाठी आलेले चौघेजण वनविभागाच्या ताब्यात
गुन्हा दाखल : वाहनासह बंदूक, जिवंत काडतुसे जप्त

संगमेश्वर : तालुक्यातील राजवाडी-ब्राह्मणवाडी साईमंदिरासमोर अणदेरी ते राजवाडी मार्गाने जाणाऱ्या बोलेरो पिकअप वाहनाच्या टपावर बसून हॅंड टॉर्चच्या सहायाने शिकार करण्यासाठी आलेल्या चौघांची झडती घेण्यात आली. यात गाडीमध्ये १२ बोअर बंदुक १, सहा जिवंत काडतुसे, दोन हॅंड टॉर्च आदी मुद्देमाल सापडला. याप्रकरणी मुद्देमाल गाडीसह जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई रत्नागिरी वनविभागाने केली.
याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी : ६ नोव्हेंबर रोजी रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास गस्त करत असताना राजवाडी- ब्राह्मणवाडी साईमंदिरासमोरील (ता. संगमेश्वर) अणदेरी ते राजवाडी मार्गाने बोलेरो पिकअप (क्र. एमएच-०८- एपी-८६२१) या वाहनाच्या टपावर बसून हॅंड टॉर्चच्या सहायाने शिकारीच्या उद्देशाने फिरणारे वाहन थांबवून गाडीची झडती घेण्यात आली. या वाहनामध्ये विश्वनाथ शांताराम मालप (वय २९, रा. अणदेरी, ता. संगमेश्वर), गजानन मानसिंग इंदुलकर (वय ४३, रा. हेदली, ता संगमेश्वर), रूपेश धोंडु पोमेंडकर (वय ४१, रा. कारभाटले, ता. संगमेश्वर) आणि राहुल रवींद्र गुरव (वय २८, रा. तिवरे घेरा प्रचितगड, ता. संगमेश्वर) हे चौघे होते. त्यांच्याकडून १२ बोअर बंदूक १, जिवंत काडतुसे ६, हॅंड टॉर्च २ इ. मुद्देमाल सापडला.
या घटनेचा भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा नोंद केला असून आवश्यक कागदपत्र तयार करून पुढील तपास चालू आहे. ही कार्यवाही मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर जी. गुरुप्रसाद (भा.व.से) व रत्नागिरी चिपळूणच्या विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती लगड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कार्यवाहीसाठी परिक्षेत्र वन अधिकारी (रत्नागिरी) प्रकाश सुतार, वनपाल संगमेश्वर (देवरुख) सागर गोसावी, वनरक्षक सुरज तेली आकाश कडूकर, सहयोग कराडे, सुप्रिया काळे यांनी केली. यासाठी अणदेरीचे पोलीस पाटील महेंद्र होडे, राजवाडीचे पोलीस पाटील विलास राऊत, सुलतान मालगुंडकर, अनंत तोरस्कर यांचे सहकार्य लाभले.
अशा प्रकारच्या घटना आजूबाजूच्या परिसरात घडत असल्यास वनविभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई यांनी केले आहे.



