लांजा-राजापूर नगरपंचायतींना आमदार किरण सामंत यांच्या प्रयत्नांना यश
५ कोटींच्या विकास निधीला मान्यता : लांजा-राजापूर नगरपंचायत हद्दीतील विकास कामांना गती मिळणार : आमदार किरण सामंत

लांजा : लांजा आणि राजापूर नगरपंचायतींच्या विविध विकासकामांसाठी आमदार किरण सामंत यांच्या पाठपुराव्यानंतर राज्य शासनाने तब्बल ५ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. हा निधी वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून दोन्ही नगरपंचायती हद्दीतील रस्ते काँक्रीटीकरण, गटारी बांधकाम, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा, स्मशान भूमी तसेच सार्वजनिक स्वच्छता आणि प्रकाशयोजना यांसारखी मूलभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत.
याविषयी बोलताना आमदार किरण सामंत म्हणाले की, “लांजा आणि राजापूर या दोन्ही नगरपंचायतींचा सर्वांगीण विकास हा माझा प्राधान्यक्रम आहे. नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी आणखी निधी मिळवण्याचा प्रयत्न सुरू राहील.”
नगरपंचायतीचे अधिकारी आणि स्थानिक जनप्रतिनिधींनी या मंजुरीबद्दल समाधान व्यक्त करत आमदार किरण सामंत यांचे आभार मानले. या निर्णयामुळे लांजा आणि राजापूरच्या नागरी विकासाला गती मिळणार आहे.



