मुख्य बातमी

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गाच्या अर्धवट कामांचा अवकाळी पावसामुळे ग्रामस्थांना फटका

आऊटलेटच्या अर्धवट कामामुळे पावसाचे पाणी थेट ग्रामस्थांच्या घरात, दुकानात शिरले 

रत्‍नागिरी : कोल्‍हापूर-रत्‍नागिरी मार्गावरील नाणीज परिसरात ठेकेदाराने ठेवलेल्‍या अर्धवट कामाचा फटका महामार्गाच्‍या दोन्‍ही बाजूकडे राहणार्‍या ग्रामस्‍थांना बसला. आज (९ मे) दुपारनंतर झालेल्या अवकाळी पावसामुळे महामार्गावरील अर्धवट असलेल्या आऊटलेटच्या कामामुळे लोकांच्‍या घरात, अंगणात, दुकानांमध्‍ये पाणी घुसून नुकसान झाले आहे. अवकाळी पावसात असा फटका बसत असेल तर मान्‍सूनमध्‍ये काय अवस्‍था होईल असा प्रश्‍न उपस्‍थित करीत नाणीज ग्रामस्‍थांनी तीव्र नाराजी केली आहे.

मागील दोन दिवसांपासून नाणीज पंचक्रोशीमध्‍ये अवकाळी पाऊस पडत आहे. आज सायंकाळी जोरदार पाऊस कोसळला. यामुळे महामार्गावरून आलेले पाणी थेट सर्व्हिस रोडवर पडत होते. तेथून थेट पाणी रस्‍त्‍याच्‍या बाजूला राहणार्‍या नागरिकांच्‍या घरात, दुकानांमध्‍ये, अंगणात घुसले. त्‍यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

महामार्गाच्‍या दोन्‍ही बाजूने गटारांची कामे अर्धवट ठेवण्‍यात आलेली आहेत. त्‍यामुळे पावसात येणारे पाणी ग्रामस्‍थांच्‍या घरात घुसत आहे. गतवर्षीही अशीच परिस्‍थिती झाली होती. मात्र वर्षभरात त्‍यावर कोणतेच काम ठेकेदार कंपनीने केले नसल्‍याचा आरोप भाजपा युवाचे पदाधिकारी चिराग खटकूळ यांनी केला आहे.

नुकताच झालेल्‍या अवकाळी पावसामुळे मोठ्याप्रमाणात पाणी ग्रामस्‍थांच्‍या घरात, दुकानांमध्‍ये व अंगणात घुसल्‍यामुळे ग्रामस्‍थांना मोठी धावपळ करावी लागली. अवकाळी पावसात ही अवस्‍था असेल तर मान्‍सूनमध्‍ये ग्रामस्‍थांनी करायचे काय असा प्रश्‍नही त्‍यांनी उपस्‍थित केला. मान्‍सूनला आणखी पंधरा-वीस दिवस असून, ठेकेदार कंपनीने तातडीने यावर मार्ग काढावा, अशी मागणीही त्‍यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!