इतर मागास बहुजन कल्याण विभाग मुलांच्या शासकीय वसतीगृहात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

रत्नागिरी : इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील व्यावयायिक व बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हानिहाय वसतीगृहे सुरू करणे या योजनेतंर्गत जिल्ह्यात इतर मागास बहुजन कल्याण मुलांचे शासकीय वसतीगृह, मुरुगवाडा रत्नागिरी येथे सुरू झाले आहे. अटी व निकष पूर्ण करणाऱ्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने सदर अर्ज https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर १ ते १८ सप्टेंबर २०२५ या कालावधीत भरावयाचे आहेत.
भरलेल्या अर्जाची एक प्रत इतर मागास बहुजन कल्याण मुलांचे शासकीय वसतीगृह, मुरुगवाडा रत्नागिरी यांचेकडे जमा करावयाची आहे. तरी सदर वसतीगृहामध्ये प्रवेश घेण्याचे आवाहन सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, उदयसिंह गायकवाड यांनी केले आहे.
या वसतीगृहात सन २०२५-२६ साठी अभ्यासक्रमनिहाय व जात प्रवर्गनिहाय रिक्त जागा पुढीलप्रमाणे आहेत. इतर मागासप्रवर्गासाठी एकूण आरक्षण ५१ टक्के, व्यावसायिक अभ्यासक्रम ३६, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम १५. विमुक्त जाती व भटक्या जमाती एकूण आरक्षण ३३ टक्के, व्यावसायिक अभ्यासक्रम २३, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम १०. विशेष मागास प्रवर्ग एकूण आरक्षण ६ टक्के, व्यावसायिक अभ्यासक्रम ४, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम २. दिव्यांग एकूण आरक्षण ४ टक्के, व्यावसायिक अभ्यासक्रम ३, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम १. अनाथ एकूण आरक्षण २ टक्के, व्यावसायिक अभ्यासक्रम १, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम १. आर्थिक मागास प्रवर्ग (EWS) एकूण आरक्षण ४ टक्के, व्यावसायिक अभ्यासक्रम ३, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम १.
वसतीगृह प्रवेशासाठी विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाचा जातीचा दाखला तसेच इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाचे वैध जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्याच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजारांपेक्षा जास्त नसावे. (तहसिलदार यांचेकडील उत्पन्न दाखला) या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याचे कमाल वय ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे. उच्च शिक्षणासाठी (व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक) प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना वसतीगृहामध्ये गुणवत्तेनुसार तसेच, संबंधित प्रवर्गनिहाय विहीत आरक्षणानुसार प्रवेश देण्यात येईल. यासाठी इयत्ता बारावीच्या गुणांची टक्केवारी विचारात घेतली जाईल.



