मुख्य बातमी

गावडे आंबेरेत (रत्नागिरी) दुचाकीस्वार मुलावर बिबट्याचा हल्ला; १५ वर्षीय मुलगा जखमी

रत्नागिरी : तालुक्यातील गावडे आंबेरे बिर्जेवाडी परिसरात दुचाकीवरून जात असलेल्या अल्पवयीन मुलावर बिबट्याने अचानक झडप घालून जखमी केल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. तेजोमय जगदीप डोर्लेकर (वय १५, रा. गावडे आंबेरे, ता. रत्नागिरी) असे जखमी मुलाचे नाव आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तेजोमय हा आपला भाऊ प्रथमेश डोर्लेकर याच्यासोबत दुचाकीवर मागे बसून पूर्णगड येथे गेला होता. तेथून परत आपल्या गावाकडे येत असताना बिर्जेवाडी येथील चढावावर अचानक बिबट्याने दुचाकीवर झडप घातली. यावेळी दुचाकीवर मागे बसलेल्या तेजोमयच्या पायावर बिबट्याने पंजा मारून त्याला जखमी केले.

हल्ल्यानंतर जखमी तेजोमयला तातडीने उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला घरी सोडण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीती आणि चिंता वाढली आहे.
दरम्यान, वनविभागाने या घटनेची दखल घेतली असून परिसरात पाहणी सुरू करण्यात आली आहे.

नागरिकांनी सतर्क राहावे, विशेषतः पहाटे आणि रात्रीच्या वेळी एकट्याने प्रवास टाळावा, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात येत आहे. या प्रकरणाची नोंद पूर्णगड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!