मुख्य बातमी

नवनिर्माण शिक्षण संस्थेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

रत्नागिरी : येथील नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या एस पी हेगशेट्ये आणि नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालयात भारतरत्न भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. स्वागत, प्रास्ताविक कनिष्ठ महाविद्यालय विभाग प्रमुख सुकुमार शिंदे यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी ऋचा जाधव, समीक्षा काटे, हसबाह धालवेलकर आणि आयेशा सावकार यांनी भाषणातून बाबासाहेबांचे शिक्षणविषयक विचार, स्त्री विषयक विचार तसेच त्यांनी समाजासाठी दिलेले योगदान यावर प्रकाश टाकला. उपस्थितांनी महामानवाच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे मुख्य वक्ते ॲड. राकेश सत्वे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील संघर्षावर सविस्तर भाष्य केले. समतेसाठी त्यांनी तयार केलेले संविधान, त्याचे महत्त्व, त्यातील तत्वे यांवर भाष्य केले.

ते म्हणाले की, “अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि विषमतेशी लढा देत बाबासाहेबांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांचा संघर्ष हा केवळ स्वतःसाठी नसून संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी आणि न्यायासाठी होता. आजच्या तरुण पिढीने त्यांच्या संघर्षातून प्रेरणा घेऊन संकटांवर मात करायला शिकले पाहिजे.”

अध्यक्षीय भाषणात संस्थेचे अध्यक्ष अभिजित हेगशेट्ये यांनी डॉ आंबेडकर यांचा अभ्यास किती बहुव्यासंगी होता हे सांगून सिंचनातून बाबासाहेबांनी केलेला विकास याबद्दल माहिती दिली.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गवाळे यांनी विद्यार्थ्यांना ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या मंत्राची आठवण करून देत अभ्यास, चिकाटी, मेहनत यांचे महत्त्व अधोरेखित केले. संविधानाची उद्देशिका खरी मार्गदर्शक आहे, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.  सूत्रसंचालन प्रा. अश्विनी कांबळे यांनी केले. प्रा. सुशील साळवी यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!