मच्छीमार नौका मासेमारीसाठी आजपासून झेपावणार समुद्रात

रत्नागिरी : पावसाळी मासेमारी बंदी संपल्यानंतर आजपासून (१ ऑगस्ट) नियमित मासेमारी सुरू होणार आहे. अवैध मासेमारीला तसेच परप्रांतीय मच्छीमार नौकांची राज्याच्या समुद्रातील घुसखोरी रोखण्यासाठी गस्ती नौकेवर शस्त्रधारी पोलिस देण्याची विनंती सहायक मत्स्यव्यवसाय विभागाकडून करण्यात आली आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात २ हजार ८०० मच्छीमार नौकांना मासेमारी परवाने देण्यात आले आहेत. दोन महिन्यांची पावसाळी मासेमारी बंदी गुरुवारच्या मध्यरात्रीपासून संपुष्टात येत आहे. शुक्रवारपासून मच्छीमार नौका समुद्रात मासेमारीसाठी जाणार आहेत. रायगडातील करंजा समुद्रात मासेमारी बंदी काळात गेलेली नौकेला जलसमाधी मिळाली. यामध्ये नौकेतील मच्छीमारांचे मृत्यूही झाले आहेत. या घटनेला स्थानिक आमदार महेश बालदी, सहकारी संस्था संचालक मंडळ, उपायुक्त एन. व्ही. भादुले व पोलिस अधिकारी जबाबदार असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने केली. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील अवैध मासेमारीवर पूर्ण लक्ष ठेवण्याचे नियोजन झाले आहे. यासाठी गस्ती नौकेवर शस्त्रधारी पोलिस मदत देण्याची मागणी सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयाकडून पोलीस अधीक्षकांकडे केल्याचे मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी जे. डी. सावंत यांनी सांगितले.
गस्ती नौका फायबरची असून परप्रांतीय मच्छीमार नौका स्टील बांधणीच्या असतात. या नौका गस्ती नौकेला धडक देण्याचा प्रयत्न करतात. त्याबरोबर परप्रांतीय नौकांवरील कामगार वर्ग हल्ला करतात. या पार्श्वभूमीवर सागरी सुरक्षा समितीच्या त्यात आयोजित बैठकीत गस्ती नौकेवर शस्त्रधारी पोलिसांची मागणी करण्यात आली आहे.



