देऊडच्या श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालयाचा १७ जानेवारीला रौप्य महोत्सव

रत्नागिरी : करजुवे पंचक्रोशी शिक्षण संस्था (ता. संगमेश्वर) संचलित रत्नागिरी तालुक्यातील देऊड येथील श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालयाला २५ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त उद्या (१७ जानेवारी) रोजी रौप्य महोत्सवी सोहळा आयोजित केला आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी प्राचार्य शशिकांत नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा होत आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, चिपळूण-संगमेश्वर-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम, माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे, प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी किरण लोहार, जिल्हा क्रीडाअधिकारी विजय शिंदे, पंचायत समिती शिक्षण विभागाचे गटशिक्षण अधिकारी डॉ. दत्तात्रय सोपनूर उपस्थित राहणार आहेत. तसेच श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालय माजी विद्यार्थी संघ, देऊड मधील ग्रामस्थ त्याचबरोबर आजी-माजी विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी स्मरणिका प्रकाशन, त्याचबरोबर देणगीदार, मान्यवर व गुणवंतांचा सत्कार सत्कार, शालेय विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन व श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालय माजी विद्यार्थी संघ व सांस्कृतिक कलामंच निर्मित दोन अंकी सामाजिक नाटक ‘अति पण किती ’ हा नाट्य प्रयोग होणार आहे.
या दिमाखदार व संस्मरणिय कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन रौप्यमहोत्सव समितीकडून करण्यात आले आहे.



