राजापूरमध्ये ५१ ग्रामपंचायतींवर प्रशासक

राजापूर : तालुक्यातील मुदत संपलेल्या ५१ ग्रामपंचायतींवर प्रशासन राज सुरू झाले असून एका-एका विस्तार अधिकाऱ्यांकडे ७ ते ८ ग्रामपंचायतींचा कारभार दिला आहे. हा भार हाकताना संबंधित अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. तर दुसरीकडे ग्रामपंचायतीमध्ये विकास कामांचा खेळ खंडोबा होणार असल्याची चर्चा सुरू आहे.
राजापूर तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींची मुदत ९ फेब्रुवारीला, तर उर्वरित ८ ग्रामपंचायतींची मुदत यापूर्वी संपली होती. त्यामुळे त्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात आले आहेत. या सर्व ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षण सोडत यापूर्वीच काढण्यात आले आहे; मात्र निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम अद्यापही जाहीर केला नसल्याने त्या ग्रामपंचायतींवर पंचायत समितीमधून प्रशासक नेमण्यात आले आहेत.
यामध्ये अणसुरे, निवेली, परटवली, तळगाव, सौंदळ, कुभवडे, मिंळद, कारवली, कोदवली, कोंडीवले, चुनाकोळवण, धोपेश्वर, ओशिवळे, रायपाटण, ओणी, कशेळी, वाडापेठ, कोंडसर बुद्रुक, सोलगाव, शिवणेखुर्द, पडवे, कोळम, हातदे, मोरोशी, जवळेथर, करक, पांगरी खुर्द, कुवेशी, मोसम, हरळ, वाल्ये, शिळ, तारळ, आडवली, आंबोळगड, ताम्हाणे, गोठणे दोनिवडे, येरडव, दळे, फुपेरे, मंदरूळ, महाळुंगे, ससाळे, गोवळ, पन्हळें तर्फे सौंदळ, पांगरे बुद्रुक, दोनिवडे, तुळसवडे, चिखलगाव, उन्हाळे, कार्जिडा आदी गावांचा समावेश आहे.



