नदीपात्रात मासेमारीसाठी गेलेल्या तिघांचीही सुखरूप सुटका

चिपळूण : तालुक्यातील खडपोली येथे मासेमारी करण्यासाठी गेलेले तिघेजण नदीपात्रामध्ये अडकल्याची धक्कादायक घटना काल (२५ मे) रात्री ९.३० वाजण्याचा सुमारास घडली. या घटनेची तातडीने दखल घेत चिपळूण तालुका प्रशासनाचे प्रमुख प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्या नेतृत्वाखाली चिपळूण तालुका प्रशासन रेस्क्यू टीमने हे बचावकार्य रात्री उशिरापर्यंत चार तासांच्या अथक प्रयत्न करून पूर्ण केले आहे. अडकलेल्यांमध्ये संतोष वसंत पवार ( ४०, रा. दळवटणे), त्यांची पत्नी सुरेखा संतोष पवार (३५) आणि पुतण्या ओंकार रवी पवार (१७ वर्ष, रा. दळवटणे राजवाडा) यांचा समावेश होता. या सगळ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.
नदीपात्रात मासेमारी करायला गेल्यानंतर अचानक पाणी वाढल्याने हे सगळे अडकले; मात्र नदीपत्रात एक बेट असल्याने ते सुरक्षित उभे राहिले होते. अन्यथा मासेमारी करायला जाणे त्यांच्या जीवावरती बेतले असते. दैव बलवत्तर म्हणून हे तिघेही सुखरूप बचावले आहेत. चिपळूण रेस्क्यू टीम या चौघांसाठी देवदूत ठरली आहे.
चिपळूण नगरपालिका आणि अग्निशमक विभाग रेस्क्यू टीम घटनास्थळी रात्री नऊच्या दरम्यान दाखल झाली होती. आपत्ती व्यवस्थापन टीममधील निखिल पवार, अजय कदम, आकाश कदम दाखल झाले. मौजे पिंपळी खुर्द सोनारवाडी येथील नदीपात्रात मासेमारीसाठी गेलेले चार लोक अडकलेले होते याची माहिती तातडीने प्रशासनाला देण्यात आली. चिपळूणचे प्रांत अधिकारी आकाश लिगाडे यांना या घटनेची माहिती समजतात त्यांनी तातडीने पाणी थांबवण्याच्या सूचना दिल्या. कोळकेवाडी येथून होणाऱ्या टप्पा एक व दोन बंद करून पाणी सोडण्याचे थांबवण्यात आले. त्यामुळे पाणी कमी झाल्यावर त्यांना सुरक्षित नदीपत्रातून बाहेर काढण्यासाठी रस्सी घेऊन रेस्क्यू टीम त्यांच्यापर्यंत पोहोचली. तोवर त्यांना पाण्याजवळ न येता सुरक्षित रित्या बेटांवरतीच उभे राहण्यासाठी धीर देण्यात आला.
पिंपळी येथील हे तिघेही अडकल्याने प्रचंड घाबरले होते. त्यामुळे वैद्यकीय पथकही तैनात ठेवण्यात आले होते. सगळ्या रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. चिपळूण पोलीस, महसूल अग्निशमन दल, नगरपालिका यंत्रणा आदी घटनास्थळी होत्या. अडकलेल्या चौघांना बाहेर काढण्यासाठी चिपळूण येथील रेस्क्यू टीम शर्थीचे प्रयत्न केले. घटनास्थळी चिपळूणचे पीआय श्री. मेंगडे दाखल झाले होते.
चिपळूण तालुक्यातील पिंपळी येथील नदीमध्ये मासेमारी करण्यासाठी गेलेल्या एक अल्पवयीन मुलगा महिला व इसमाला तब्बल चार तासानंतर सुरक्षित बाहेर काढण्यात आले. महसूल, पोलीस, नगरपालिका, वैद्यकीय विभाग , महानिर्मिती व आपदा मित्र यांचे एकत्रित टीमवर्कचे चिपळूण तालुक्यातील नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे. चिपळूणचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेगडे यांचा ऑपरेशन झाले असतानाही ते बचाव कार्यात दाखल झाले होते. मान्सूनच्या पहिल्याच दिवशी रेस्क्यू टीमच्या कामाचा कस लागला होता. या सगळ्या प्रकारावर अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड व पोलीस चिपळूण येथील पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र राजमाने लक्ष ठेवून होते.



