प्रजासत्ताक दिनानिमित्त रत्नागिरी जिल्ह्यातील सहा निर्जन बेटांवर ध्वजारोहण

रत्नागिरी : जिल्हा पोलीस दलामार्फत जिल्ह्यातील सुवर्णदुर्ग किल्ला (हर्णै, दापोली), बाबा मलंग दर्गा (खेड), जुवाड पेठ बेट (गोवळकोट, चिपळूण), जुव्याचे पेंद (कुरधुंडा, संगमेश्वर), जुवे बेट (बुरंबेवाड, नाटे) आणि वाकडवन (कोंडसर, नाटे) या सहा निर्जन बेटांवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले.

भारताचे पंतप्रधान यांनी डीजीपी – आयजीपी परिषद २०२४ मध्ये सागरी सुरक्षेला अधिक बळकटी देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रातील निर्जन बेटांवर दरवर्षी दिनांक १५ ऑगस्ट व २६ जानेवारी रोजी ध्वजारोहण करावे तसेच त्या ठिकाणी रात्र वास्तव्य करावे, असे निर्देश महाराष्ट्र पोलीस दलाला दिले आहेत. त्या अनुषंगाने, प्रजासत्ताक दिनानिमित्ताने रत्नागिरी जिल्ह्यातील सागरी हद्दीत असलेल्या बेटांवर रत्नागिरी पोलीस दलामार्फत विशेष उपक्रम राबविण्यात आला.
जिल्ह्यात एकूण १५ बेटे असून त्यापैकी २ बेटे मनुष्यवस्तीची व १३ बेटे निर्मनुष्य आहेत. या पैकी सुवर्णदुर्ग किल्ला (हर्णै, दापोली), बाबा मलंग दर्गा (खेड), जुवाड पेठ बेट (गोवळकोट, चिपळूण), जुव्याचे पेंद (कुरधुंडा, संगमेश्वर), जुवे बेट (बुरंबेवाड, नाटे) आणि वाकडवन (कोंडसर, नाटे) या सहा निर्जन बेटांवर यशस्वीरित्या ध्वजारोहण करण्यात आले.
दापोली पोलीस ठाणे हद्दीमधील हर्णैतील सुवर्णदुर्ग किल्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या वेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, दापोलीचे पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर, पोलीस निरीक्षक (जिविशा) अश्वनाथ खेडकर पोलीस उपनिरीक्षक हेमराज निर्मळ, पोलीस उपनिरीक्षक राजकुमार यादव यांसह मत्स्य विभाग व बंदर विभाग दापोली येथील कर्मचारी, पोलीस पाटील, माजी सैनिक, एनसीसीचे विद्यार्थी व पोलीस अंमलदार उपस्थित होते.
या उपक्रमातून सागरी सीमांची सुरक्षितता, राष्ट्रीय सार्वभौमत्व व अखंडता जपणे तसेच निर्जन बेटांवर पोलीस सुरक्षा यंत्रणांची प्रभावी उपस्थिति बाबत महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.



