जि. प. शाळा पिरंदवणे नं. १ येथे ग्रंथप्रदर्शन

संगमेश्वर : कविवर्य कुसुमाग्रज अर्थात ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक वि. वा. शिरवाडकर यांच्या जयंतीच्या औचित्याने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळा पिरंदवणे नं. १ येथे मराठी भाषा गौरव दिन संपन्न झाला.

यावेळी पदवीधर शिक्षक योगेश मुळे यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषा गौरव दिनाचे महत्त्व समजावून सांगितले. कवी कुसुमाग्रजांचे मराठी साहित्यातील गौरवपूर्ण योगदान आणि त्यांना प्राप्त झालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराची माहिती दिली. मराठी भाषेला राज्यकारभाराची भाषा म्हणून छत्रपती शिवरायांनी मानाचे स्थान दिले हा इतिहास सांगतानाच मुख्यमंत्री डॉ. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिल्याचे यावेळी आवर्जून सांगितले.
यानिमित्ताने शाळेच्या ग्रंथालयामधील निवडक पुस्तकांचे प्रदर्शन मांडण्यात आले. ग्रंथ, लेखकाचे नाव, प्रकाशक यांच्याविषयी माहिती देण्याचे काम उपशिक्षक सचिन इंगळे यांनी केले. विद्यार्थ्यांनी ग्रंथ हाताळण्याचा, वाचनाचा अनुभव घेत त्यानंतर आयोजित चर्चासत्रात त्याबाबत मनोगत व्यक्त केले.


