मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

मतपेट्यांच्या सुरक्षेसाठी ‘महाविकास आघाडी’ सरसावली

राजापूर नगराध्यक्षपदाच्या उमेदवार हुस्नबानू खलिफे यांनी पदाधिकाऱ्यांसह दिले तहसीलदारांना निवेदन

राजापूर : नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर, न्यायालयाच्या आदेशानुसार मतमोजणीची तारीख अनपेक्षितपणे पुढे ढकलल्याने राजकीय वातावरण तापले आहे. मतमोजणीची नवीन तारीख २१ डिसेंबर निश्चित करण्यात आली असून, या प्रदीर्घ कालावधीत स्ट्रॉंग रूममध्ये ठेवलेल्या मतपेट्यांमध्ये कोणताही फेरफार होऊ नये किंवा मतदानाचे निकाल बदलण्याचा प्रयत्न होऊ नये, यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.

मतदान होऊन मतमोजणीसाठी २० दिवसांपेक्षा जास्त कालावधी मिळणार असल्याने, या काळात मतपेट्यांच्या सुरक्षेबाबत महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदन देत, स्ट्रॉंग रूम आणि मतपेट्यांच्या सुरक्षेसाठी चोख व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. मतमोजणी होईपर्यंत मतपेट्यांमध्ये कोणताही बदल होणार नाही याची खात्री प्रशासनाने द्यावी, असेही या निवेदनात म्हटले आहे.

निवेदन देताना नगराध्यक्षपदाच्या उमेदवार खलिफे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी जितेंद्र खामकर, तालुकाध्यक्ष कमलाकर कदम, अजीम जैतापकर, सुलतान ठाकूर, संजू पवार, सुभाष बाकाळकर, अमृत तांबडे, निसार मुल्ला, शबनम मुल्ला, अफरोझ झारी आदी उपस्थित होते. महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मागणीमुळे आता निवडणूक अधिकारी मतपेट्यांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!