कोकणाचा विध्वंस करणारा शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा
शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

सिंधुदुर्गनगरी : शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन सिंधुदुर्ग शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. शिष्टमंडळात राजू शेट्टी, गिरीश फोंडे, सतीश लळीत, माजी आमदार वैभव नाईक, एम के गावडे, प्रकाश पाटील, किशोर ढगे, शिवाजी कांबळे, युवराज शेटे, तानाजी भोसले, काका ढोके,राजेंद्र गड्ड्यांवर यांच्यासहित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, मार्च २०२४ मध्ये पवनार वर्धा ते पत्रादेवी सिंधुदुर्ग असा ८०२ किलोमीटर लांबीचा शक्तीपीठ महामार्ग याचे गॅझेट नोटिफिकेशन प्रसिद्ध झाले. तेव्हापासून शेतकरी याला विरोध दर्शवत १२ जिल्ह्यांमध्ये आंदोलन करत आहेत. या महामार्गामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे, पर्यावरणाचे प्रचंड नुकसान होणार आहे. तसेच हा महामार्ग जनतेच्या पैशाचा एक लाख कोटींचा अपव्यय करणारा आहे. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया चे प्रति किलोमीटर प्रमाणित खर्च यापेक्षा दुप्पट खर्च यामध्ये दाखवला गेला आहे. त्यामुळे यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या महामार्गाची कोणीही मागणी केली नव्हती शिवाय रत्नागिरी नागपूर हा पर्याय महामार्ग याच दिशेने जाणारा तयार झाला आहे. पुन्हा त्याला समांतर असा हा शक्तीपीठ महामार्ग केवळ कंत्राटदारांच्यासाठी तयार केला जात आहे. सत्ताधारी पक्षांना इलेक्टोरल बोंड मध्ये देणग्या दिलेल्या कशा रीतीने झुकते माप देऊन महाराष्ट्रात, देशात कंत्राटे दिली जातात हे जनतेने उघडपणे पाहिले आहे.
हा महामार्ग सह्याद्रीच्या डोंगर रांगा चिरत कोकणात येणार आहे. कोकणामध्ये हा महामार्ग आणण्याचे कारण कोकणातील खनिज संपत्तीची लूट करून इतरत्र वाहतूक करणे हा आहे. कोकणामधील जंगल संपत्ती व खनिज संपत्तीची लूट करून येथील जैवविविधता देखील धोक्यात येणार आहे. ज्या परिसरातून हा महामार्ग जाणार आहे. तेथे वाघासारख्या अनेक प्राण्यांचा अधिवास आहे. केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या पश्चिम घाट संवर्धनासाठीच्या माधव गाडगीळ आयोगाने येथील भाग हा पर्यावरणीय संवेदनशील जाहीर केला आहे. हा महामार्ग या आयोगाच्या शिफारशीकडे डोळेझाक करणार आहे.त्याबरोरच या परिसराला ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाच्या साक्ष असलेले अनेक ठिकाणांच्या जवळून हा महामार्ग जातो. त्या ऐतिहासिक वारसांना देखील धक्का पोहोचण्याची शक्यता आहे
निसर्ग संपन्न अशा कोकणाला सर्व समावेशी व शाश्वत विकासाची गरज आहे. यामध्ये स्थानिक जनतेच्या इच्छा आकांक्षा व हित लक्षात घेतले पाहिजे. या अगोदरही केवळ उद्योगपतींना लाभ पोहोचवणाऱ्या, खनिज संपत्तीची लूट करणाऱ्या खाणी कोकणच्या जनतेवर सरकारने लादल्या होत्या. त्या विरोधात देखील कोकणातील जनतेने आंदोलन केले. शेतकरी, सर्वसामान्य जनता केंद्रबिंदू मानून केलेल्या विकासाचे नेहमी आम्ही स्वागतच करू. पण उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनतेला विश्वासात न घेता केलेल्या धोरणांना जनतेकडून विरोध हा होणारच. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने हा महामार्ग रद्द करण्यात येणार असल्याचे सांगितले. पण निवडणूक संपल्यानंतर लगेचच यू टर्न घेतला व महामार्ग रेटत आहे. या महामार्गाला जनतेचा विरोध आहे व भविष्यातही राहणारच. त्यामुळे हा महामार्ग रद्द करावा अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढवू असा इशारा या निवेदनाद्वारे आम्ही देत आहोत.



