महाराष्ट्रमुख्य बातमी

अजित दादा अनंतात विलीन

बारामती : ‘एकच वादा, अजित दादा,’ ‘अमर रहे, अमर रहे, अजित दादा अमर रहे,’ ‘परत या, परत या, अजित दादा परत या…’ दादा, दादा… असा हंबरडा फोडत हजारोंच्या साश्रू नयनांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अखेरचा निरोप दिला.

गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अजित दादांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री, राज्य सरकारमधील मंत्री, खासदार, आमदार आणि राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी अजित दादांना श्रद्धांजली अर्पण केली. असा मनमिळाऊ, दिलखुलास, दिलदार नेता परत होणार नाही. अशा अवेळी अजित दादांसारखा उमदा नेता गमावल्याने धक्का बसल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

अजित पवार यांचे ज्येष्ठ पुत्र पार्थ पवार यांनी पार्थिवाला अग्नी दिला. त्यानंतर हजारो उपस्थितांनी हळहळ व्यक्त केली. ”महाराष्ट्राची शान, पुणे जिल्ह्याचा अभिमान, बारामतीचा आत्मा… राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार अमर रहे… शेतकरी, कष्टकरी, बहुजनांचे कैवारी अजित दादा अमर रहे, अमर रहे’ अशा घोषणा देण्यात आल्या. दादा, दादाचा हंबरडा फोडत आक्रोश व्यक्त करण्यात आला.

‘कोणतीही अडचण असो, आम्ही दादांकडे जायचो. दादांच्या एका शब्दानेही असंख्य अडथळे दूर व्हायचे. शब्द दिला की, तो खरा करून दाखवण्याची धमक होती त्यांच्यात. आता काम घेऊन कोणाकडे जायचे, आमचे छत्र हरपले,’ अशी भावना दादांच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या मुल्ला समाजातील एकाने व्यक्त केली.

बुधवारी सकाळी बारामतीत विमान कोसळून अजित पवार यांचे निधन झाले. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून अजित दादांच्या अंत्यदर्शनासाठी दादांवर प्रेम करणाऱ्या हजारो कार्यकर्ते, नागरिकांनी बारामतीत गर्दी केली. बुधवारी रात्री उशिरापर्यंत विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात नागरिकांची रीघ लागली होती.

गुरुवारी सकाळी काटेवाडी येथे अजित दादांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. काटेवाडी येथे दादांच्या घरी अंत्यदर्शनासाठी नागरिकांची रीघ लागली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनीही कुटुंबीयांसह काटेवाडीत अजित पवार यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. ज्येष्ठ नेते शरद पवार, सुनेत्रा पवार यांच्यासह कुटुंबीयांचे सांत्वन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!