जागतिक वसुंधरा अभियान यशस्वी करा : मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे
२२ एप्रिलपासून अभियानाची सुरुवात

रत्नागिरी : जागतिक वसुंधरा दिनापासून (२२ एप्रिल) ते १ मे या कालावधीत वसुंधरा अभियानाच्या विविध उपक्रमाची अंमलबजावणी करून माझी वसुंधरा अभियान यशस्वी करा, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे यांनी केले.

माझी वसुंधरा या अभियानाची सुरुवात २२ एप्रिल रोजी तालुक्यातील पानवल ग्रामपंचायत येथे कार्यक्रमाने करण्यात आली. या अभियानाच्या विविध उपक्रमांची माहिती देत असताना गाव स्वच्छ सुंदर करून लोकांमध्ये घनकचरा, सांडपाणी, वैयक्तिक स्वच्छता तसेच गावाची स्वच्छता सातत्यपूर्ण ठेवावी म्हणजे आपली वसुंधरा सुरक्षित राहील व आपले आयुष्यमान वाढेल. तसेच गावामध्ये सर्व कुटुंबांकडील ओला कचरा, सुका कचरा, प्लास्टीक, काचा इतर वस्तूंचे वर्गीकरण करुन आपल्या गावात तयार झालेले कचरा संकलन शेडचा वापर करावा व ग्रामपंचायतीला यापासून आर्थिक फायदा होईल, असे यावेळी सांगण्यात आले. तसेच पानवल ग्रामपंचातीत माझी वसुंधरा अभियानानिमित्त श्रमदान मोहीम, नदीची साफसफाई करण्यात आली.
या कार्यक्रमाला उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) राहुल देसाई, कृषी अधिकारी सुनील चव्हाण, मुख्य कार्यकारी अभियंता अक्षय बोरसे तसेच रत्नागिरी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी चेतन शेळके, श्रीमती प्राजक्ता नागवेकर, विस्तार अधिकारी (पं.) तसेच सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचयत सदस्य व नागरिक या उपस्थित होते. श्रीमती तनिष्का होरंबे, सरपंच यांनी उपस्थितांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



