मुंबई महापालिकेवर अखेर भाजप-शिवसेना महायुतीची सत्ता

मुंबई : मुंबई महापालिका निवडणूक कोण जिंकणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. मुंबई महानगरपालिकेत भाजप आणि ठाकरे अशी थेट लढाई झाली. निवडणुकांमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेल्या देशाची अर्थिक राजधानी मुंबई कुणाची? या प्रश्नाचे उत्तर अखेर मिळाले आहे. मराठी माणूस, मराठी महापौर, अदाणीकरण हा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी आणल्यानंतर देखील ठाकरे बंधूंना मुंबई महापालिका आपल्याकडे खेचून आणण्यात यश मिळाले नाही. मुंबईत भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने ११४ चा जादूई आकडा गाठण्यात यश मिळवले आहे.
देशातील सर्वात मोठी महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेवर भाजपचा झंझावात दिसून आला. भाजपने ९० जागा खिश्यात घातल्या आहेत. तर दुसरीकडे शिंदे सेना २८ जागांवर आघाडीवर आहे. या निकालातून भाजपने मोठा विजय मिळवल्याचे अधोरेखीत होत आहे. बहुमताच्या आकडेवारीमुळे भाजपचा पहिल्यांदाच मुंबईत महापौर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई महापालिकेच्या इतिहासात आतापर्यंत भाजपचा कोणताही नेता महापौर होऊ शकला नाही. गेल्यावेळी ती संधी चालून आली असतानाही भाजपने नाराजी असतानाही एकीकृत शिवसेनेच्या महापौराला पाठिंबा दिला होता. महापौर निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराला मोठ्या मनाने पाठिंबा दिला होता. आता भाजपने सत्ता मिळवल्याने भाजपचा महापौर कोण होणार? याची चर्चा होत आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागा आहेत. महापौर पदासाठी ११४ जागांची गरज आहे. सध्याचे निकाल पाहता भाजपचे ९० नगरसेवक तर शिंदे सेनेला २८ जागांचे गणित पाहता या महायुतीकडे ११८ जागांचे समीकरण जुळत आहे. त्यामुळे भाजपचा महापौर होणार हे निश्चित मानले जात आहे. त्यामुळे इतर पक्षांचा टेकू न घेता मॅजिक फिगर महायुती गाठली आहे. आता महापौर कोण होणार याची उत्सुकता आहे. भाजपकडून मुंबईचा पहिला महापौर होण्याचे भाग्य कुणाला लाभते यावर खल सुरू आहे. पार्टी विथ डिफरन्स म्हणवणारी भाजप महापौर पदासाठी कुणाचे नाव पुढे करते याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत भाजप महापौर पदासाठी कोणता प्रयोग राबवते आणि कुणाला या पदाची सूत्र सोपवते याविषयी चर्चा सुरू आहे. भाजप महिलेला हे पद देणार की गुजराती, हिंदी भाषिकांची वर्णी लावणार यावरही खल सुरू आहे. तर भाजपने यापूर्वी वायदा केल्याप्रमाणे एखाद्या मराठी माणसाला महापौर पदाची लॉटरी लागणार हीच खास चर्चा आहे.


