पाटपन्हाळे हायस्कूलच्या नेहा निवाते व वेदिका चव्हाणचे सुयश
'एनएमएमएस' परीक्षा गुणवत्ताधारक व काव्य वाचन स्पर्धकांचा गौरव

आबलोली : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील शैक्षणिक योजनेमधील शिष्यवृत्ती (एनएमएमएस) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयामधील इयत्ता आठवीमधील विद्यार्थिनी नेहा संदीप निवाते हिने सर्वसाधारण गटामध्ये १११ गुण मिळवून रत्नागिरी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत १९ व्या क्रमांकाचे सुयश संपादन केले आहे. तसेच वेदिका उदय चव्हाण हिने सर्वसाधारण गटामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील गुणवत्ता यादीत १०१ गुण प्राप्त करून ४७ वा क्रमांक पटकावला आहे.
या विद्यार्थिनींना ‘एनएमएमएस’ शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे. तसेच गुहागर तालुका मराठी भाषा मंडळ गुहागरतर्फे नुकत्याच झालेल्या तालुकास्तरीय ऑनलाईन काव्यवाचन स्पर्धेतील प्राथमिक गटात कस्तुरी संतोष घाणेकर व स्वरा सुदेश जाधव तसेच माध्यमिक गटात समृध्दी सुरेश आंबेकर व मृण्मयी दत्ताराम जाधव यांनी सहभाग नोंदवला होता.
न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयातून ‘एनएमएमएस’ परीक्षेतील गुणवत्ताधारक इ.८वीमधील नेहा निवाते, वेदिका चव्हाण व गुहागर तालुकास्तरीय ऑनलाईन काव्यवाचन स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांचे पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षा सुचिता वेल्हाळ, सचिव सुधाकर चव्हाण व पदाधिकारी, मुख्याध्यापक व्ही. डी. पाटील, पर्यवेक्षक जी. डी. नेरले व शिक्षकवृंद यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व शालेय उपयोगी वस्तू भेट देऊन अभिनंदन केले.
या विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख व विज्ञान शिक्षक के. डी. शिवणकर, मराठी भाषा शिक्षक सौ. एस. एस. चव्हाण, एस. एम. आंबेकर यांचे मार्गदर्शन लाभल्याबद्दल पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी व मुख्याध्यापक तसेच शिक्षकवृंदांनी अभिनंदन केले.



