मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

हिंद-दी-चादर’ मोफत वैद्यकीय सेवा पंधरवड्यांतर्गत ५१८ रुग्णांची तपासणी

रत्नागिरी : शिख धर्माचे नववे गुरू श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या शहीदी समागमानिमित्त ‘हिंद-दी-चादर’या विशेष उपक्रमांतर्गत निःशुल्क वैद्यकीय सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुंच्या त्याग, शौर्य आणि मानवतेच्या संदेशाला कृतीतून अभिवादन करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असून ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मोफत उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालय अधिनस्त संस्था उपजिल्हा रुग्णालय कळंबणी, ग्रामीण रुग्णालय, मंडणगड आणि उपजिल्हा रुग्णालय, दापोली येथे “हिंद की चादर” या उपक्रम अंतर्गत आरोग्य शिबिर घेण्यात आले. उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे १७८ रुग्णांची तपासणी तर ग्रामीण रुग्णालय, मंडणगड येथे १४३ रुग्णांची तपासणी करण्यात आली. आणि उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे १९७ रुग्णांची तपासणी करण्यात आली.

समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांना, विशेषतः माता व बालकांना, सुलभ व गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा देणे हा या पंधरवड्याचा मुख्य उद्देश आहे. कार्यक्रमांतर्गत लहान मुलांसाठी व गर्भवती मातांसाठी आवश्यक लसीकरण मोहिमेचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच उपस्थित नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी करून आवश्यक औषधोपचार दिले जात आहेत. यासोबतच विविध आरोग्य विषयांवरील मार्गदर्शन व शासकीय योजनांविषयी जनजागृती करण्यात येत आहे.

‘सेवा परमो धर्मः’ हा संदेश प्रत्यक्ष सेवा कार्यातून अधोरेखित करत गुरुंच्या बलिदानाची आठवण जपण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत आहे. ग्रामीण भागात अशा प्रकारच्या मोफत आरोग्य सेवांमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!