भाजपच्या दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी राजेश सावंत यांची फेरनिवड

रत्नागिरी : भाजपच्या दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी पुन्हा एकदा राजेश सावंत यांची फेरनिवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. लोकसभा, कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपाच्या अभूपतपूर्वी यशामुळे आणि भाजपचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष, आमदार रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय यामुळे श्री. सावंत यांना संधी मिळाली आहे.
भाजपने विविध जिल्ह्यांतील जिल्हाध्यक्षांची घोषणा प्रसिद्धीपत्राद्वारे केली. त्यात सावंत यांना पुन्हा संधी मिळाल्याने रत्नागिरीत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
निवड झाल्यानंतर श्री. सावंत यांनी सांगितले की, “लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. त्यामुळे या सर्व निवडणुकांत कार्यकर्त्यांना विजयी करण्याची व भाजपा प्रदेशाकडून येणाऱ्या कार्यक्रमांची आखणी, नियोजन करून यश मिळवण्यासाठी कार्यरत राहणार आहे. खासदार नारायण राणे, कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री नीतेश राणे यांच्यामुळे पुन्हा एकदा जिल्हाध्यक्षपदाची संधी मिळाल्याबद्दल मी त्यांचे विशेष आभार मानतो. सर्वांना सोबत घेऊन भाजपाची ताकद वाढवण्यासाठी, कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी या पदाचा मी वापर करेन.”
राजेश सावंत हे गेल्या आठ वर्षांपासून भाजपचे संघटनात्मक काम करत आहेत. त्यांनी जिल्हा सरचिटणीस म्हणून काम केले असून गेले दीड वर्ष ते जिल्हाध्यक्ष होते. यापूर्वी त्यांनी राजकीय जीवनात तालुकाध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष अशी पदे अन्य पक्षामध्ये भूषवली आहेत. त्यामुळे ते संघटनात्मक जबाबदारी चांगल्या प्रकारे निभावतात. यामुळेच त्यांना पुन्हा ही संधी मिळाल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.



