पाटपन्हाळे महाविद्यालयात वसंतराव नाईक जयंती उत्साहात साजरी

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयक्युएसी अंतर्गत सांस्कृतिक विभागाच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे सचिव सुधाकर चव्हाण यांच्या हस्ते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करण्यात आली. यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ. प्रमोद देसाई यांनी वसंतराव नाईक यांच्या सामाजिक व राजकीय कार्यकर्तृत्वाचा थोडक्यात आढावा घेतला. ते म्हणाले, “वसंतराव नाईक हे सर्वात जास्त कालावधीसाठी राहिलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांना हरित क्रांतीचे प्रणेते म्हणून ओळखतात. ग्रामीण भागातील शेतकरी व शेतीसाठी विविध प्रकारच्या योजना त्यांनी आणल्या होत्या. शेतकऱ्याच्या पिकाला हमीभाव मिळून देणारे वसंतराव नाईक होते.”
या कार्यक्रमाला सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. जालिंदर जाधव, डॉ. प्रसाद भागवत, डॉ. प्रवीण सनये, प्रा. लंकेश गजभिये, प्रा. सौम्या चौघुले, ग्रंथालय परिचर परशुराम चव्हाण व महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. जालिंदर जाधव यांनी केले, तर उपस्थित मान्यवर व विद्यार्थांचे आभार प्रा. सौम्या चौघुले यांनी मानले.



