मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

शिक्षिका मृगया मोरे यांच्या पाच पुस्तकांचे प्रकाशन

लांजा : तालुक्यातील प्राथमिक शिक्षिका मृगया मंगेश मोरे यांनी लिहिलेल्या पाच पुस्तकांचे प्रकाशन रत्नागिरी जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. संपूर्ण शालेय व्यवस्थापन सांभाळून आणि विविध उपक्रम राबवून ही पाच पुस्तके त्यांनी लिहिण्यात आली.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बालभारती पुण्याचे विशेष अधिकारी अजय कुमार लोळगे उपस्थित होते. सशक्त, ज्ञानसंपन्न विद्यार्थी व समाज घडवायचा असेल तर शिक्षकांनी ‘देणाऱ्याने देत जावे’ या उक्तीप्रमाणे तन-मन धन अर्पण करून समाजाचे दिशादर्शक बनणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन याप्रसंगी पुणे विशेषाधिकारी डॉ. लोळगे यांनी केले. याप्रसंगी व्यासपीठावर न्यायाधीश सुरज मोरे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) किरण लोहार, डाएट रत्नागिरीच्या वरिष्ठ अधिव्याख्याता दीपा सावंत, झी मराठी हास्य कलाकार श्रीकांत ढालकर, उपशिक्षणाधिकारी सूर्यवंशी, लेखिका मृगया मंगेश मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

मृगया मोरे यांनी लिहिलेल्या ‘मनाच्या हिंदोळ्यावर’, ‘मनाच्या तळ्यावरती’ हे ललित लेखसंग्रह तसेच ‘आजीच्या कुशीतल्या गोष्टी’, ‘अमुक तमुक गोष्टी’ हे बाल तात्पर्य कथासंग्रह आणि ‘चिमुकल्यांच्या लेखणीतून’ हा त्यांच्या विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या कथा, कविता यांचा संग्रह अशा एकूण पाच पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मृगया मोरे यांनी आजवर नवोपक्रम, कृती संशोधन, शैक्षणिक नियतकालिके, निबंध आदी विविध क्षेत्रांमध्ये विपुल लेखन केले आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्कारासह अनेक मान्यवर संस्थांचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

प्रकाशन कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्रीकांत ढालकर यांनी मृगया मोरे यांचे लेखन म्हणजे जुन्या नव्यांचा समन्वय साधण्याचा केलेला यशस्वी प्रयत्न असल्याचे प्रतिपादन केले.

याप्रसंगी न्यायाधीश सुरज मोरे, वरिष्ठ अधिव्याख्याता दीपा सावंत, कार्यक्रमाचे अध्यक्ष किरण लोहार, विद्यार्थिनी सृष्टी गुरव, सुधाकर गंगावणे, विशाल मोरे आदींनी लेखिकेच्या साहित्याविषयी गौरवोद्गार काढले.

कार्यक्रमाला शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर, मोरे व यादव परिवार, मित्रमंडळी, आप्तेष्ट यांची बहुसंख्येने उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशील जाधव यांनी केले, तर आभार मंगेश मोरे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!