नीलेश राणे यांचे मालवणमध्ये स्टिंग ऑपरेशन
भाजप कार्यकर्त्याच्या घरात आढळली पैशांची बॅग

मालवण : एकीकडे स्थानिक निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय वातावरण तापले असतानाच दुसरीकडे शिवसेनेचे आमदार नीलेश राणे यांनी स्टिंग ऑपरेशन करत भाजपच्या एका स्थानिक पदाधिकाऱ्याच्या घरावर धाड टाकली. यात संबंधित पदाधिकाऱ्याकडे पैशांनी भरलेली बॅग आढळल्याने एकच खळबळ उडाली. याबाबतची माहिती आमदार नीलेश राणे यांनी समाज माध्यमावरून दिली.
सध्या निवडणुकीमुळे सर्वच राजकीय पक्षांचे नेते प्रचारात व्यस्त आहेत. आपापल्या परीने रणनीती आखत मतदारांच्या भेटी गाठी घेत आहेत. याच दरम्यान, आमदार नीलेश राणे यांना मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपकडून वेगळीच चाल खेळली जात असल्याची कुणकुण लागली. पाठपुराव्याच्या जोरावर स्टिंग ऑपरेशन करत एका स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांच्या घरातून रोख रक्कमेची एक बॅग आढळली आहे. ज्यावर त्यांनी दावा केला आहे की ही रक्कम निवडणुकीपूर्वी मतदारांमध्ये वाटप करण्यासाठी जमा करण्यात आली होती.
नीलेश राणे यांनी हे स्टिंग ऑपरेशन समाज माध्यमांमधून लोकार्पित केले. या प्रकरणाची माहिती मिळताच स्थानिक निवडणूक अधिकारी व पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान, या कारवाईनंतर राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मालवणमधील आगामी नगरपालिका निवडणुकीचे राजकीय वातावरण आता अधिकच बिकट झाले आहे.



