आरोग्यमुख्य बातमी

जिल्ह्यात १५ ऑगस्टपर्यंत “अंगदान जीवन संजीवनी अभियान”

रत्नागिरी : केंद्र शासनाच्या विविध अभियानांतर्गत ३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत “अंगदान जीवन संजीवनी अभियान” राबविण्यात येणार असून, याचा शुभारंभ जिल्हा शासकीय रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप आणि वरिष्ठ अधिकारी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाला.

या प्रसंगी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विकास कुमरे यांनी उपस्थितांना अवयव दानाची आवश्यकता व प्रक्रिया याबाबत माहिती दिली. अवयव दान मोहिमेअंतर्गत सद्यस्थितीत रत्नागिरी जिल्ह्यात नेत्र संकलन केंद्र कार्यरत असून गेल्या वर्षभरात दहा व्यक्तींच्या नातेवाईकांनी मरणोत्तर नेत्रदान केले आहे. त्याचप्रमाणे जास्तीत जास्त व्यक्तींनी आपल्या नातेवाईकांचे मरणोत्तर नेत्रदान करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक यांनी केले.

ब्रेन डेथ झाल्यानंतर हृदय, यकृत, स्वादुपिंड, किडनी, डोळे यांसारखे अवयव दान करून आठ जणांच्या जीवन वाचवण्यासाठी उपयोग होत असतो. त्यासाठी ब्रेन डेथ झाल्यावर विभागनिहाय मंडळाद्वारे याची शहानिशा करून प्रमाणपत्र दिल्यानंतर अवयव दान केले जातात. रत्नागिरी जिल्ह्यात अशा प्रकारे एका व्यक्तीच्या नातेवाईक यांनी ईच्छा व्यक्त केल्यावर कोल्हापूर विभागीय मंडळाने परवानगी दिल्यावर अशाप्रकारे अवयव दान करण्यात आले आहे.

या प्रसंगी अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा नोडल अधिकारी संदीप उगवेकर यांनी नेत्रदानाचे महत्त्व विशद करून मरणोत्तर नेत्र दान कोणी व कशाप्रकारे करावे याबाबत माहिती दिली. नेत्रदान समुपदेशक राम चिंचाळे यांनी उपस्थितांकडून अवयव दान प्रतिज्ञा म्हणून घेतली. नेत्रविभाग प्रमुख डाॅ. वनिता कानगुले यांनी नेत्रदानानंतर बुब्बूळ प्रत्यारोपण आवश्यक असणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय डेरवण येथे नावनोंदणी साठी आवाहन केले.

या प्रसंगी एनसीडी वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तम राव कांबळे, डॉ. आठले, डॉ. गावंडे, डॉ. यश प्रसादे, मेट्रन जयश्री शिरधनकर, इन्चार्ज सिस्टर रसिका सावंत, आंबेकर सिस्टर, सामाजिक कार्यकर्ते सचिन भरणे, समुपदेशक प्रवीण भोईर उपस्थित होते.

“मृत्यू नंतरही जीवन देता येते. आपल्या एका निर्णयामुळे अनेकांना जीवनदान मिळू शकते. अवयव व नेत्रदान हे अत्यंत पवित्र व मानवतेचा सर्वोच्च प्रतीक आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन समाजात जागृती निर्माण करावी व अवयव दान आणि नेत्रदान यासाठी पुढाकार घ्यावा. जास्तीत जास्त नागरिकांनी अवयव दानासाठी नोंदणी करून गरजू रुग्णांना जीवनाची नवी आशा द्यावी, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!