एसटीचा भोंगळ कारभार; गाडीत नसलेल्या सीटचे दिले आरक्षण
आर्थिक भुर्दंड आणि नाहक मानसिक त्रास : कारभाराबाबत प्रश्नचिन्ह

रत्नागिरी : रत्नागिरी बसस्थानकातून सुटणाऱ्या रत्नागिरी – पुणे (मलकापूर मार्गे) या गाडीचे आरक्षण केलेली सीटच गाडीत नसल्याचा अजब प्रकार आज (६ मे) एका प्रवाशासोबत घडला. या प्रकारामुळे गाडी सुटण्यास १५ मिनिटांचा विलंब तर झालाच शिवाय काढलेल्या एका तिकिटाचे पैसे भरूनही सीट न मिळाल्यामुळे नाहक मानसिक त्रास झाला. एसटी या भोंगळ कारभारामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
याबाबत सविस्तर हकीकत अशी की, एका महिला प्रवाशाने आपल्यासह दोन मुलांची सीट आरक्षित केली होती. ही बस ६ मे रोजी रात्री ९ वाजता रत्नागिरी बसस्थानकातून पुणे (मलकापूर मार्गे) साठी सुटणार होती. त्याप्रमाणे रात्री ८.५५ ही गाडी (क्र. एमएच-४०-एन-९८४४) बस स्थानकात दाखल झाली. संबंधित गाडीच्या वाहकाने प्रवाशांचे आरक्षित सीट नंबर विचारून त्यांना आत सोडण्यास सुरुवात केली; मात्र या प्रकारात प्रवाशाला दिलेल्या ४१, ४२ आणि ४४ या तीन सीटपैकी गाडीला ४४ नंबरची सीटच नसल्याचे या वाहकाकडून सांगण्यात आले.
तीन तिकिटांचे पैसे भरून आरक्षण घेतलेले असतानाही हा अजब प्रकार घडल्याने काहीकाळ वातावरण तापले. दोन सीटवर एक लहान मुल ऍडजस्ट करू, मात्र एका तिकिटाचे पैसे परत द्या किंवा दुसरी सीट उपलब्ध करून द्या, अशी मागणी करण्यात आली. मात्र १५ मिनिटानंतर वाहकाने एक सीट ऍडजस्ट करून देतो सांगून दिव्यांगासाठी आरक्षित असलेली सीट संबंधित प्रवाशाला दिली. त्यानंतर ९.१५ वाजता गाडी बसस्थानकातून सोडण्यात आली. मात्र प्रवास सुरू झाल्यानंतर खेडशीच्या अलीकडील महालक्ष्मी थांबा येथे एक दिव्यांग बांधव चढले. त्यांचीही सीट आरक्षित असल्याने आणि तीच सीट लहान मुलीला दिल्याने त्यांच्या सीटचा प्रश्न निर्माण झाला.
पायाने दिव्यांग असलेल्या त्या बांधवानेही कोणतीही तक्रार न करता सुमारे अर्ध्या-पाऊण तासाचा प्रवास ड्रायव्हरच्या शेजारील सीटवर बसून केला. त्यानंतर मात्र त्यांना पायांना त्रास होऊ लागल्याने ते आपल्या सीटवर बसण्यासाठी आले. त्यामुळे पुन्हा एका सीटचा प्रश्न उद्भवला. दोन मुलांसह व्यवस्थित बसता यावं यासाठी बाजूबाजूच्या तीन सीटचे आरक्षण केले होते. मात्र या भोंगळ कारभारामुळे लहान मुलीला मात्र एकदा आपल्या आईकडे आणि एकदा आपल्या भावाकडे अशी नाचानाच करावी लागली.
तिकिटाचे पैसे भरूनही केवळ एसटीच्या भोंगळ आणि बेजबाबदार कारभारामुळे प्रवाशाला आर्थिक भुर्दंड आणि नाहक मानसिक त्रासात प्रवास करावा लागला. त्यामुळे केवळ लाखोंचा निधी खर्च करून चकाचक इमारती उभारून काही उपयोग नाही, तर त्यात काम करणारे कर्मचारीही तितकेच प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि जबाबदार असावे लागतात, हीच बाब या घटनेतून अधोरेखित होत आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अशीच घटना मुंबई गाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशाबरोबरही घडल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यांनाही मुंबई गाडीचे आरक्षण दिले होते; मात्र प्रत्यक्षात त्या गाडीत ती सीटच नसल्याने प्रवाशाला नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. त्यामुळे शासन, प्रशासन नागरिकांसाठी कितीही चांगल्या सुविधा देत असले, तरी त्याची अंमलबजावी जाणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून अशा घटना वारंवार घडत असल्याने एकूणच कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे.



