मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

संगमेश्वरमधील चोरीच्या गुन्ह्यामध्ये एकाला ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश

संगमेश्वर : संगमेश्वर ते देवरुख रोडवरील दत्त कृपा मोबाइल शॉपी फोडून ५१ हजारांचा ऐवज लंपास करणाऱ्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ताब्यात घेतले असून, त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेला १८ हजार ९९९ किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी त्याला न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शंकर अर्जुन साळुंखे उर्फ शंकर अर्जुन पाटील (वय २३ वर्षे, रा. गणपती मंदिराशेजारी, गुंडगे ता. कर्जत जि. रायगड) असे त्याचे नाव आहे.

८ ते ९ ऑक्टोबरदरम्यान राजेश तुकाराम आंबवकर यांच्या दत्त कृपा मोबाइल शॉपी दुकानाचे कुलूप तोडून दुकानामधील ३ मोबाईल, १ जीओचा राऊटर, १ पॉवर बँक, १ ब्ल्यूटुथ हेडफोन, १ स्मार्ट वॉच असा एकूण ५१ हजार ४९९ किंमतीचा मुद्देमाल चोरट्याने चोरून नेला होता. या अनुषंगाने संगमेश्वर पोलीस ठाण्यात भा.न्या. सं चे कलम ३०५ (अ), ३३१ (४) अन्वये गुन्हा दाखल केला होता.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चोरी व घरफोडी संदर्भातील गुन्ह्यांना प्रतिबंध व कारवाई करण्याचे अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला तसेच सर्व पोलीस ठाणे यांना सूचना दिल्या आहेत. या सूचनांप्रमाणे तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याच्या तपासाच्या दृष्टीने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांनी गुन्ह्याच्या तपासाची दिशा ठरवून एक तपास पथक तयार करून आरोपीच्या शोधाबाबत सूचना दिल्या होत्या. घटना स्थळावरून मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे हा गुन्हा शंकर पाटील उर्फ शंकर साळुंखे याने केल्याची व हा इसम हा सध्या शहापूर (जि. ठाणे) येथे असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार शाखेचे पथक या गुन्ह्यातील आरोपीच्या शोधासाठी शहापूर व मुरबाड (जि. ठाणे) येथे पाठविण्यात आले होते.

या पथकाने शंकर अर्जुन साळुंखे उर्फ शंकर अर्जुन पाटील याला ११ नोव्हेंबर रोजी ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली असता त्याने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच चोरीचा १९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

शंकर साळुंखे उर्फ शंकर पाटील याची अधिक चौकशी केली असतात त्याने सुमारे १ महिन्यापूर्वी राजापूर येथून स्प्लेंडर मोटार सायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे. याबाबत राजापूर पोलीस ठाण्यात भा.न्या. सं. चे कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल आहे.

या गुन्ह्यामध्ये शंकर साळुंखे उर्फ शंकर पाटील याला अटक केले असून त्याच्यावर रायगड व ठाणे जिल्ह्यांमध्ये यापूर्वी चोरी व घरफोडीसारखे एकूण ३ गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास संगमेश्वर पोलीस ठाणे करीत आहे.

ही, कामगिरी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय आंबेकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल विवेक रसाळ, पोलीस हेडकॉन्स्टेबल दीपराज पाटील, चालक पोलीस कॉन्स्टेबल अतुल कांबळे यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!