राजापुरातील सीएनजी पंपाजवळ दारूने भरलेल्या पिकअपचा अपघात

राजापूर : राजापूर येथील सीएनजी पंप परिसरात दारूने भरलेल्या महिंद्रा पिकअप (क्र. एमएच-०७-एजे-५०७५) या वाहनाने तीन वाहनांना पाठीमागून धडक देत अपघात केल्याची घटना घडली. या अपघातानंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच राजापूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातानंतर संबंधित पिकअप वाहन ट्रॅक्टरच्या सहाय्याने ओढत कोदवली येथील साहेबाच्या धरण रस्त्याकडे नेण्यात आले. तेथे वाहनातील दारूचा साठा दुसऱ्या वाहनात हलविण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, उपसभापती अभिजीत गुरव यांना या प्रकाराची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित पिकअप वाहन दारूसह ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.
मात्र, ज्या दारूने भरलेल्या वाहनाने अपघात केला, ते वाहन पोलिस घटनास्थळी उपस्थित असतानाही तेथून हलविण्यात कसे आले, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जात असून घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.
या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी वाहनांचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेमुळे परिसरात मोठी चर्चा रंगली असून, अवैध दारू वाहतुकीबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. राजापूर पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

