मुख्य बातमी

जयगडमध्ये दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

जबाबदारांवर ‘एफआयआर’ दाखल करण्याचा ग्राम समितीचा निर्णय

रत्नागिरी : गेल्या ४ ते ५ दिवसांपासून जयगड ग्रामस्थांना अत्यंत गढूळ आणि चिखलमिश्रित पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (ता.१६) सकाळी ११:०० वाजता ग्रामपंचायत कार्यालय जयगड येथे ‘ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समिती’ची एक तातडीची सभा अध्यक्ष अनिरुद्ध कमलाकर साळवी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या सभेत दूषित पाणीपुरवठ्याबाबत अत्यंत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला असून, पावसाच्या सुरुवातीलाच जीवाशी खेळणाऱ्या या हलगर्जीपणाबाबत जबाबदार असणाऱ्या व्यक्तीविरोधात थेट एफ आय आर दाखल करण्याचा निर्णय समितीने एकमुखाने घेतला आहे.

आजच्या या तातडीच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. त्यानुसार आजच पाण्याची टाकी संपूर्णपणे भरून व स्वच्छ करून नवीन पाणी सोडण्याचे निश्चित करण्यात आले आहे. तसेच नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या दोषींवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. दरम्यान, जयगड पोलीस ठाण्यात याबाबतचे पत्र देण्यात आले आहे.

 

याबाबत सविस्तर माहिती अशी, गेली ४० वर्षे कळझोंडी धरणावरून या भागातील पाणी योजना यशस्वीपणे सुरू आहे. गेल्या दोन वर्षांत धरणाची उंची वाढविणे, जॅकेटिंग आणि ग्राऊटिंगचे काम कोट्यवधी रुपये खर्च करून पूर्ण करण्यात आले. मात्र, या नूतनीकरणादरम्यान झालेल्या तांत्रिक चुकांचा फटका आता नागरिकांना बसत आहे. धरणातील पाणी आता थेट नवीन जॅकवेलमध्ये (पंप हाऊस) सोडले जाते. पूर्वीच्या पंप हाऊसला नैसर्गिक झरे होते, ज्यामुळे कितीही पाऊस पडला तरी काही तासांतच पाणी नैसर्गिकरित्या स्वच्छ होत असे. मात्र, नवीन जॅकवेलला नैसर्गिक झरे न ठेवता तळापासून थेट सिमेंट काँक्रीटने आरसीसी बांधकाम करण्यात आले आहे.

सद्यस्थितीत या नवीन विहिरीमध्ये बांधकाम साहित्याचे अवशेष जसे की फळ्या, खिळे, सळ्या, प्लायवूडचे तुकडे आणि कच्च्या कपऱ्या मोठ्या प्रमाणात पडून आहेत. हेच दूषित आणि घातक पाणी थेट जलवाहिनीद्वारे घराघरांमध्ये पोहोचत आहे.

ग्रामीण भागाला शुद्ध पाणी मिळावे यासाठी येथे कोट्यवधी रुपये खर्च करून पाणी पुरवठा साठवण टाक्या आणि आधुनिक जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले होते. परंतु, काही दिवसांपूर्वी झालेल्या अवघ्या एका मोठ्या पावसाच्या सरीत हे कोट्यवधी रुपयांचे जलशुद्धीकरण केंद्र पूर्णपणे निकामी झाले आहे. केंद्र बंद पडल्यामुळे धरणातील गाळमिश्रित पाणी थेट ग्राहकांपर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकल्पाच्या आणि पंप हाऊसच्या बांधकामाची वरिष्ठ पातळीवरून तातडीने चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

या गंभीर समस्येचे पडसाद आता प्रशासकीय आणि कायदेशीर पातळीवर उमटू लागले आहेत. जयगड ग्रामपंचायतीने आणि ग्राम आरोग्य, पोषण, पाणीपुरवठा व स्वच्छता समितीने या प्रकरणी थेट जयगड सागरी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार सादर केली आहे. जाणीवपूर्वक दूषित पाणीपुरवठा करून सर्वसामान्य नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या जबाबदार अधिकारी, कर्मचारी आणि संस्था यांच्याविरोधात गुन्हा नोंदवा, अशी मागणी केली आहे. ९ जून २०२६ रोजी पाऊस पडल्यापासून ते १५ जून पर्यंत ग्रामस्थांना अत्यंत दूषित पाणी पेयजल म्हणून पुरवण्यात आले. हे पाणी जीवघेणे व आरोग्याला धोकादायक असल्याने दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी आग्रही मागणी ग्रामपंचायतीने पत्राद्वारे केली आहे.

या बैठकीला समितीचे अध्यक्ष अनिरुद्ध साळवी यांच्यासह रवींद्र परचोंडे, साजिद जांधारकर, जितेंद्र पारकर, प्रमोद घाटगे, नारायण काताळकर, साईराज चुंदर, भालचंद्र पारकर, प्रमोद झगडे, संतोष पवार, विकास निवाळकर, अनिल कोंबके, दिशा मयेकर, तन्वी मयेकर, रजनी परकर, अक्षदा देवरूखकर आणि सिद्धार्थ देवरूखकर यांसह अनेक मान्यवर ग्रामस्थ व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सद्यस्थितीत नागरिकांना तात्पुरता व स्वच्छ पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी जे एस डब्लू कंपनीकडून आलेल्या पत्रावर तात्काळ सकारात्मक पाठपुरावा करण्याचेही सभेमध्ये निश्चित करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!