मुख्य बातमी

रत्नागिरीतील वाटद येथे सीएनजी गॅसचा नवा प्रकल्प : पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी : तालुक्यातील वाटद येथे सीएनजी गॅसचा नवा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उद्योग व पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील सीएनजी इंधनाशी संबंधित अनेक प्रश्न मार्गी लागण्यासोबतच मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीची द्वारे खुली होणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पालकमंत्री सामंत यांनी सोमवारी (१५ जून) येथे आयोजित पत्रकार परिषदेत रत्नागिरीच्या आगामी विकासकामांचा आणि पावसाळी नियोजनाचा सविस्तर आढावा घेतला. वाटद येथील नियोजित सीएनजी प्रकल्प हा केवळ इंधन पुरवठ्यापुरता मर्यादित नसून, तो जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाचे एक महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे. यासोबतच जिल्ह्यात आगामी काळात इतरही अनेक पूरक प्रकल्प येणार असून, त्यामुळे स्थानिक तरुणांच्या हाताला काम मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शहरातील वाढत्या गरजा लक्षात घेता, आरोग्य सुविधा सक्षम करण्यावर प्रशासनाचा भर आहे. रत्नागिरीत कर्करोगासारख्या गंभीर आजारांवर उपचार मिळणे काळाची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर, शहरात निर्माण होणाऱ्या वैद्यकीय कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यासाठी ‘बायो-मेडिकल वेस्ट’ आणि कचरा विघटन प्रकल्प उभारला जाणार आहे. याशिवाय, रत्नागिरी शहराची पाणीटंचाई कायमस्वरूपी दूर करण्यासाठी एमआयडीसीकडून पाणी मिळवण्याबाबत प्रशासन गांभीर्याने विचार करत आहे, असेही सामंत यांनी नमूद केले.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आवाहन पाऊस लांबल्यामुळे यंदा खरीप हंगाम काहीसा लांबणीवर पडला आहे. शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना बियाणे मोफत वाटप करण्यात आली असली, तरी पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पावसाचा अचूक अंदाज घेऊनच पेरणी करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

आपत्ती व्यवस्थापनासाठी २६० कोटींची निवारा केंद्रे 

यंदाच्या पावसाळ्यात रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर दरडी कोसळण्याचा (भूस्खलन) धोका लक्षात घेता, आपत्ती व्यवस्थापन विभाग पूर्णपणे सतर्क ठेवण्यात आला आहे. चिपळूण येथे एनडीआरएफचे पथक तैनात करण्यात आले असून, जिल्ह्यातील भूस्खलनाचा धोका असलेल्या २१ संवेदनशील ठिकाणी सुमारे २६० कोटी रुपये खर्च करून अद्ययावत निवारा केंद्रे उभारली जात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!