स्मार्ट मीटरसंदर्भात ठाकरे शिवसेनेची जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट

रत्नागिरी : जिल्ह्यात सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेबाबत नागरिकांकडून येत असलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिष्टमंडळाने दक्षिण रत्नागिरी जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
स्मार्ट मीटर बसविताना काही ठिकाणी घरातील प्रमुख व्यक्ती अनुपस्थित असताना मीटर बदलण्यात आल्याच्या तसेच हरकत घेणाऱ्या महिला ग्राहकांशी अयोग्य वर्तन झाल्याच्या तक्रारी नागरिकांनी पक्षाकडे केल्याचे शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांच्या निदर्शनास आणून दिले. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले.
स्मार्ट मीटर योजनेबाबत नागरिकांच्या मनात अनेक शंका असून, विद्यमान मीटर कार्यरत असताना ते बदलण्याची आवश्यकता, ग्राहकांची संमती न घेता राबविण्यात येणारी प्रक्रिया, भविष्यातील प्रीपेड प्रणालीची शक्यता आणि ग्राहकांवर पडणारा अतिरिक्त आर्थिक भार यासंदर्भातील प्रश्न शिष्टमंडळाने उपस्थित केले.
यावेळी दत्ताजी कदम यांनी शिवसेनेचा विरोध तंत्रज्ञानाला नसून जनतेच्या मनातील संभ्रम आणि संभाव्य अन्यायाला असल्याचे स्पष्ट केले. कोणतीही योजना राबविताना पारदर्शकता, संवाद आणि जनतेचा विश्वास महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
शिष्टमंडळाने नागरिकांवर दबाव टाकणे, दमदाटी करणे किंवा जबरदस्तीने मीटर बदलण्याच्या तक्रारींची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. तसेच नागरिक आणि स्मार्ट मीटर बसविणारे कर्मचारी यांच्यातील संभाव्य संघर्ष टाळण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन केले.
पोलीस अधीक्षकांनी प्राप्त तक्रारींची दखल घेत महावितरण तसेच संबंधित ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांबाबत आलेल्या तक्रारींची चौकशी करण्यात येईल, अशी माहिती शिष्टमंडळाने दिली.
या प्रसंगी रत्नागिरी शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, युवासेना जिल्हा अधिकारी प्रसाद सावंत, उपतालुकाप्रमुख विजय देसाई, उपशहरप्रमुख सलील डाफळे, युवासेना शहर अधिकारी आशिष चव्हाण, विभागप्रमुख प्रशांत सुर्वे, सरफराज शेख तसेच अन्य पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
स्मार्ट मीटरबाबत नागरिकांच्या शंका दूर होऊन संबंधित यंत्रणांकडून स्पष्ट भूमिका मांडली जाईपर्यंत या प्रक्रियेत संयम बाळगावा, अशी मागणीही शिष्टमंडळाने यावेळी केली.



