मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

रजवेल (खेड) येथे गोठ्याला भीषण आग; १७ दुभती जनावरे मृत्यूमुखी

खेड : तालुक्यातील रजवेल गावातील मेहमूद दाऊद हमदुले यांच्या गुरांच्या वाड्याला आज (१८ जून) पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत गुरांचा संपूर्ण वाडा भस्मसात झाला असून तब्बल १७ दुभती जनावरे होरपळून मृत्यूमुखी पडली आहेत.

आग इतकी भीषण होती की काही क्षणांतच तिने संपूर्ण वाड्याला विळखा घातला. स्थानिक ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र आगीचा वेग मोठा असल्याने जनावरांना वाचविणे शक्य झाले नाही. या दुर्घटनेत हमदुले कुटुंबाचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हमदुले यांच्या मालकीच्या गोठा क्रमांक ६.६ अ आणि ६ ब मध्ये अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केल्याने संपूर्ण गोठा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. या आगीत १ गाय, १ वासरू, ९ म्हशी आणि ६ रेडकू अशा एकूण १७ जनावरांचा मृत्यू झाला. आगीची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जीवाची पर्वा न करता त्यांनी दोन जनावरे सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळवले. दरम्यान, अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत गोठ्यासह घराच्या पडवीचे मोठे नुकसान झाले होते. या दुर्घटनेत गोठा, घराची पडवी आणि जनावरे मिळून सुमारे २४ लाख ७५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच ग्राम महसूल अधिकारी आकाश बोरखेडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. आगीचे नेमके कारण शोधण्याचे काम संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच भाजपा नेते खेडचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी मेहमूद हमदुले व त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करत शासनाकडून योग्य ती आर्थिक मदत व नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे आश्वासन दिले.

या दुर्दैवी घटनेमुळे रजवेल परिसरात हळहळ व्यक्त होत असून, प्रशासनाने पंचनामा करून नुकसानग्रस्त कुटुंबाला तातडीची मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

याप्रसंगी खेडचे पोलीस निरीक्षक विवेक आयरे, खेडचे तहसीलदार सुधीर सोनवणे, भाजपा अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक गटनेते रहीम सहिबोल, दाऊद हमदुले, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा रत्नागिरीला सरचिटणीस वैजेश सागवेकर, मनोज दांडेकर, करण वैभव खेडेकर, प्रदीप भोसले, ओवैस चौगुले तसेच स्थानिक गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!