राजापूरच्या विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही : आमदार किरण सामंत

राजापूर : शहरातील सुरू असलेल्या, मंजूर झालेल्या तसेच प्रस्तावित विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आमदार किरण सामंत यांनी गुरुवारी राजापूर शासकीय विश्रामगृहात नगराध्यक्ष, नगरसेवक आणि नगरपालिका प्रशासनाची विशेष बैठक घेतली. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी कमी पडू देणार नसून, प्रस्तावित विकासकामे लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
बैठकीत शासनाच्या विविध योजनांअंतर्गत शहरात सुरू असलेल्या विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विकासकामांचा दर्जा कायम राखत ती निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना आ. सामंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच शासनस्तरावर मंजूर झालेल्या विविध प्रकल्पांच्या प्रगतीची माहिती घेऊन आवश्यक मार्गदर्शनही केले.
यावेळी नगर परिषदेच्या विविध प्रस्तावित विकासकामांवर सविस्तर चर्चा झाली. यामध्ये नवीन नगर परिषद प्रशासकीय इमारतीसाठी १५ कोटी रुपये, बहुउद्देशीय सभागृहासाठी ३ कोटी रुपये, मच्छी व मटण मार्केट उभारणीसाठी ३ कोटी रुपये, सफाई कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान व संरक्षक भिंतीसाठी १ कोटी रुपये, तसेच नगर परिषदेच्या मालकीच्या शाळांची दुरुस्ती, तळी स्वच्छता आणि उद्यानांचे सुशोभीकरण यासाठी ३ कोटी रुपयांच्या प्रस्तावांचा समावेश आहे.
या सर्व विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्यासमवेत बैठक घेऊन शासनस्तरावर आवश्यक पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन आ. किरण सामंत यांनी दिले. शहराच्या विकासाला गती देण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये समन्वय असणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
बैठकीस नगराध्यक्ष ॲड. हुसेनबानू खलिफे, उपनगराध्यक्ष विनय गुरव, काँग्रेस गटनेते ॲड. जमीर खलिफे, शिवसेना गटनेते ॲड. राहुल तांबे, मुख्याधिकारी अभिजित कुंभार यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या विविध नागरी समस्या आणि विकासकामांशी संबंधित मुद्द्यांवर बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली.


