रत्नागिरीतील एस. एम. जोशी फिजीओथेरपी कॉलेजचा
पंढरपूरच्या वारीत सहभाग; वारकऱ्यांची केली सेवा

रत्नागिरी : विठ्ठलाच्या भेटीच्या ओढीने अनेक किलोमीटर पायी चालणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करावी असा संकल्प करत रत्नागिरीतील नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या एस. एम. जोशी कॉलेज ऑफ फिजीओथेरपीच्या विद्यार्थ्यांनी वारीत सहभागी होत वारकऱ्यांची सेवा केली.
महाराष्ट्राला संतपरंपरेचा आणि भक्ती चळवळीचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. ही वारी समता, भक्ती, प्रेम, बंधुभाव आणि मानवतेची शिकवण देणारी आहे. संतांच्या विचारांनी प्रेरित लाखो वारकरी दरवर्षी आषाढी वारीत सहभागी होऊन पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी जातात. यंदा पंढरपूरला निघालेल्या आषाढी वारीमध्ये ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ या उपक्रमांतर्गत रत्नागिरीतील फिजीओथेरपी महाविद्यालयातील विद्यार्थी कोल्हापूर येथे या वारीत सहभागी झाले.

यामध्ये सानिका जाधव, कशिश उपाध्याय, पृथ्वीराज चौहान, अनुष्का बिराजदार, वरद बल्लाळ, सलोनी पाटील, सांजली टकले, नेत्रा औसरमल, श्रेया पोसनाक आदी २५ हून अधिक विद्यार्थ्यांचा समावेश होता. मैलोनमैल वारी सोबत चालणाऱ्या या वारकऱ्यांच्या थकल्या दमल्या पायांना या मुलांनी मसाज केला. तसेच त्यांना फिजीओ ट्रिटमेंट दिली. या विद्यार्थ्यांचे सर्वच वारकरी मंडळींनी विशेष कौतुक केले.
प्रेमाचा, समतेचा, मानवतेचा आणि भक्तिभावाचा संदेश घेऊन जाणाऱ्या वारीतील मुलांचा उत्स्फूर्त सहभाग हा नवनिर्माण संस्थेच्या प्रगल्भ वैचारिक आणि शैक्षणिक वाटचालीला अधिक विस्तारित करणारा आहे. आज महाराष्ट्राच्या २२ जिल्ह्यातील मुले एस. एम. जोशी फिजीओथेरपी (BPTH) रत्नागिरी महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. ॲकॅडमीक एक्सलन्सी सोबतच सामाजिक जाणीवांचे भान आणि सहभागाचे शिक्षण वारीच्या सहभागाने विशेष अनुभव देणारे होते.



