“रत्नागिरी जिल्हा बोली भाषा” विषयावर रंगले एक दिवसीय संमेलन

चिपळूण : मराठी साहित्य परिषद, चिपळूण शाखा, विभा अरविंद ग्रंथालय, चिपळूण आणि श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मोतीवाले परांजपे हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने “रत्नागिरी जिल्हा बोली भाषा” या विषयावर एक दिवसीय संमेलन संपन्न झाले.
संमेलनाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि प्रा. यास्मिन शेख यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. सूत्रसंचालन प्रा. विकास मेहेंदळे यांनी केले. प्राचार्य विजय कुलकर्णी यांनी प्रस्तावना करताना मराठी साहित्य परिषदेच्या शंभर साहित्य संमेलन आयोजनाचा उद्देश सांगून प्रा. यास्मिन शेख यांच्या मराठी भाषेसाठी असलेल्या योगदानाचा उल्लेख केला.
संमेलनाचे अध्यक्ष प्रा. संतोष गोणबरे यांनी बोलीभाषा त्यांचे महत्त्व, भाषेतील विविध शब्द, उच्चार आणि संवर्धनात असलेले महत्त्व विशद केले. जनता सहकारी बँक चिपळूणचे व्यवस्थापक हृषिकेश लेले व्यवस्थापक यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या व्यवहारात इंग्रजी शब्दां ऐवजी बोलीभाषेतील शब्द वापरावेत त्यातून बोली भाषा समृद्ध होईल, असे मत व्यक्त केले. प्रशांत देवळेकर यांनी बोली भाषेवर संमेलन आयोजित केल्याबद्दल संयोजकांना धन्यवाद देत कौतुक केले. तसेच अशा कार्यक्रमांची गरज व्यक्त केली. विभा अरविंद ग्रंथालय खेंडचे कार्यवाह तथा स्वागताध्यक्ष विजय कदम यांनी उपस्थितांचे आभार मानले.
दुसऱ्या सत्रात बोली भाषा सत्राध्यक्ष अरुण इंगवले उपस्थित होते. त्यांच्या अध्यक्षते खाली प्रा. मनाली बावधनकर यांनी खारवी बोली , दुर्गेश आखाडे यांनी धनगरी बोली, अमोल पालये कुणबी बोली, मुझफ्फर सय्यद यांनी दालदी बोली, सुनील कदम यांनी कोळी बोलीभाषा संदर्भात भाषा सौष्ठव, भाषेचा गोडवा, एकच वस्तू विषयाच्या संदर्भात असलेले विविध शब्द, सण, उत्सव, समारंभात गायली जाणारी गीते आणि मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी दिलेले शब्द यांचा उल्लेख केला.
अरुण इंगवले यांनी बोलीभाषेतील शब्द आणि विविध वैशिष्ट्ये सांगून बोलीभाषा अस्तित्वात राहण्यासाठी साहित्याचे जतन- संवर्धन करण्यासाठी सर्व बोलीभाषा अभ्यासकांनी एका व्यासपीठावर येऊन बोलीभाषेचा प्रचार, प्रसार, प्रसिद्धी आणि अभ्यास करावा आणि त्यामध्ये युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.
दापोलीचे प्रा. कैलास गांधी कवी संमेलन सत्र अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली कवींनी प्रामुख्याने आनंदराव पवार महाविद्यालय, खेंड येथील वेदिका विष्णू हरवडे, वैष्णवी गजानन हळदे यांनी स्वरचित कविता सादर केल्या. या बरोबरीने रूपाली पाटील, माधुरी खांडेकर, विशाखा चितळे, सुनील कदम, मुझफर सय्यद, विजय कदम, राष्ट्रपाल सावंत, संदीप परुळेकर, प्रा. संदीप येलंये, प्रा. विक्रांत टेरवकर यांनी आपल्या दर्जेदार आणि प्रसंगाला विषयाला अनुरूप कविता सादर केल्या.
‘लेखक आपल्या भेटीला’ या शेवटच्या सत्राच्या अध्यक्षस्थानी विजय कदम होते. लेखक राजा बर्वे यांनी त्यांच्या “इरसाल कोकण रंग” या पुस्तकातील इरसाल कोकणी माणसांच्या जीवंत व्यक्तिरेखा साकारताना बोलीभाषेचे महत्त्व विशद केले. सौ. प्रीतम खामकर यांनी “उंबरठ्यावरची दिवाळी” ही कथा सादर केली.
कार्यक्रमाला प्राचार्य बाळासाहेब यादव, डॉ. उमेश कुमार बागल, धीरज वाटेकर, संचालक सुहास चव्हाण, विभा अरविंद ग्रंथालयाचे अध्यक्ष बापू काणे तसेच आनंदराव पवार महाविद्यालय, डॉ. तात्यासाहेब नातू महाविद्यालय, ज्ञानदीप महाविद्यालय येथील प्राध्यापक विद्यार्थी आणि सन्माननीय लेखक कवी आणि नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमांचे आभार प्रदर्शन प्रा. विकास मेहेंदळे संचालक विभा अरविंद ग्रंथालय यांनी केले.



